लोकलमधील प्रवाशांचा वाद आता सहप्रवाशांच्या जिवावर बेतू लागला आहे. अंधेरी स्थानकात दोन प्रवाशांमधील भांडणाचा शेवट एक निष्पाप प्रवासी रक्तबंबाळ होण्यात झाला. एकमेकांवर राग काढण्यासाठी केलेल्या हत्याराच्या फेकीत बाजूलाच उभ्या असलेल्या सुरेश शर्मा यांच्या छातीत हत्यार घुसले. अचानक घडलेल्या या प्रकाराने डब्यात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी अंधेरी रेल्वे पोलिसांनी शिवाजी गायकवाडला अटक केली आहे.
बोरीवली-चर्चगेट फास्ट लोकलने प्रवास
झारखंडमधील हजारीबाग येथील मूळ रहिवासी असलेले सुरेश द्वारका शर्मा गेल्या दोन वर्षांपासून धारावी परिसरात राहतात. सुतार काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १५ नोव्हेंबरला कामानिमित्त ते बोरीवली पूर्व येथे गेले होते. काम आटोपून सकाळी ११.५८ वाजता त्यांनी बोरीवलीहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी अप फास्ट लोकल पकडली. पहिल्या जनरल डब्यात दरवाजाजवळ उभे राहून ते प्रवास करत होते.
सहप्रवाशांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद
प्रवास सुरू झाल्यानंतर त्यांच्या मागील बाजूला बसलेल्या दोन प्रवाशांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अंधेरी स्थानक जवळ येताच वाद अधिकच चिघळला. दोघेही दरवाजाजवळ आले. दुपारी १२.१२ वाजता लोकल अंधेरी स्थानकात थांबताच त्यापैकी एक जण फलाटावर उतरला, तर दुसरा डब्यातच राहिला. फलाटावर उतरलेला तरुण डब्यातील प्रवाशाला शिवीगाळ करत होता.फलाटावरुन फेकलेलं हत्यार तिसऱ्याच्याच छातीत घुसलं
लोकलने फलाट सोडताच संतापलेल्या तरुणाने हातातील धारदार हत्यार डब्यात फेकले. त्याचा निशाणा डब्यातील दुसरा प्रवासी होता; मात्र हत्यार त्याला न लागता दरवाजाजवळ उभ्या असलेल्या सुरेश शर्मा यांच्या छातीच्या उजव्या बाजूला घुसले. काही क्षणांतच त्यांच्या शर्टावर रक्ताचे डाग पसरले आणि ते गंभीर जखमी होऊन खाली कोसळले.
