मुंबई महानगर पालिकेच्या मुख्य सभागृहात अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला जागा नसल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य सभागृहाऐवजी स्थायी समिती अथवा दुसऱ्या सभागृहात पुतळा लावावा असा अभिप्राय प्रशासनाने दिला आहे. देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात बसविण्याच्या मागणीला प्रशासनाने जागेच्या अभावाचे कारण देत नकार दर्शविला आहे. सभागृहात यापूर्वीच 13 मान्यवरांचे पुतळे आणि काही महापुरुषांची तैलचित्रे असल्याने, नव्याने पुतळा किंवा तैलचित्र बसविण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वाजपेयी यांचा पुतळा मुख्य सभागृहाऐवजी स्थायी समिती सभागृह किंवा अन्य समिती सभागृहात बसविण्याचा पर्याय प्रशासनाने सुचविला आहे. भाजपच्या तत्कालीन नगरसेविका दक्षा पटेल यांनी 25 सप्टेंबर 2018 रोजी यासंदर्भातील ठरावाची सूचना मांडली होती. नगरसेविका दीपाली गोसावी यांनी या सूचनेला अनुमोदन दिले होते. त्यानंतर 9 ऑक्टोबर 2018 रोजी महापालिका सभेत ठराव क्रमांक 874 अन्वये हा प्रस्ताव आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आला होता.
स्मृती जपण्यासाठी पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी
अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषविले. उत्कृष्ट संसदपटू, प्रभावी वक्ते, कवी आणि साहित्यिक म्हणूनही त्यांची ओळख होती. देशाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. अशा नेत्याची स्मृती जपण्यासाठी मुंबई महापालिकेच्या विशाल सभागृहात त्यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या मागणीबाबत सभागृहातील जागेची उपलब्धता आणि वारसावास्तूचे महत्त्व लक्षात घेण्याची भूमिका घेतली आहे.
कशी आहे मुख्य इमारत?
मुंबई महापालिकेची मुख्य इमारत ही श्रेणी दोनमधील वारसावास्तू असून, व्हिक्टोरियन वास्तुशैलीतील सभागृहाला ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व आहे. सध्या या सभागृहात 247 जणांची बैठक व्यवस्था आहे. त्यामध्ये 232 जागा नगरसेवकांसाठी, तर 15 जागा अधिकारी आणि पत्रकारांसाठी राखीव आहेत. नगरसेवकांची संख्या वाढल्याने अधिकारी आणि पत्रकारांच्या बैठक व्यवस्थेवरही ताण निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत नव्याने पुतळा किंवा तैलचित्रासाठी जागा देणे शक्य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रशासनाचा अभिप्राय या आठवड्यात सभागृहात सादर होणार आहे.
13 मान्यवरांचे सभागृहात पुतळे मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक
सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि लोकमान्य टिळक यांच्यासह एकूण 13 मान्यवरांचे पुतळे आहेत. याशिवाय काही महापुरुषांची तैलचित्रेही सभागृहात लावण्यात आली आहेत. त्यामुळे नव्या पुतळ्यासाठी नसल्याचे प्रशासनाने आपल्या अभिप्रायात नमूद केले आहे.
