‘माझ्या शरीराचा एक भागच सुपूर्द करतोय’; क्रिकेट संग्रहालयाला 25 बॅट देताना क्रिकेटचा देव सचिन भावुक, काय म्हणाला?

माझे क्रिकेट किट हा माझ्या शरीराचा एक भागच होता. त्यातील वस्तू आणि बॅट आज मी तुम्हाला भेट म्हणून देत आहे. असे समजा की, मी माझ्या शरीराचा एक भागच सुपूर्द करत आहे. त्याला जपा…’, अशा भावना भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी सोमवारी व्यक्त केल्या. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शरद पवार क्रिकेट संग्रहालयाला त्यांनी २५ बॅट आणि वस्तू भेट म्हणून दिल्या. त्यावेळी ते भावूक झाले.

‘…आता तुमच्या स्वाधीन’

‘माझ्या किट बॅगेतील बॅट, ग्लव्हज, हेल्मेट, पॅड आणि कॅप अशा सगळ्या गोष्टी मी जीवापाड जपल्या आहेत. वर्षानुवर्षे जपलेला हा ठेवा आता तुमच्या स्वाधीन करत आहे’, असे सचिन म्हणाले. यावेळी सचिन यांची पत्नी अंजली, मुलगी सारा, मुलगा अर्जुन आणि कुटुंबीय उपस्थित होते. ‘या खजिन्यात आयुष्यातील पहिली बॅटही आहे. ती माझी बहीण सविता हिने खास काश्मीरहून आणली होती,’ असे सांगत सचिन यांनी तेथे उपस्थित बहिणीकडे पाहिले.

२५ बॅट आणि क्रिकेट किटमधील निवडक साहित्य भेट

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि तमाम क्रिकेटप्रेमींचे लाडके व्यक्तिमत्त्व सचिन तेंडुलकर संवाद साधणार म्हणजे जणू किस्स्यांची मैफलच रंगणार. सोमवारी मुंबईतील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यालयात निवडक क्रीडा पत्रकारांनी अशाच गप्पांची मेजवानी अनुभवली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शरद पवार क्रिकेट संग्रहालयाला सचिन तेंडुलकर यांनी आपल्या २५ बॅट आणि क्रिकेट किटमधील निवडक साहित्य भेट दिले. ज्या बॅटनी धावांच्या राशी उभारल्या, ‘विक्रमादित्य’ अशी ओळख मिळवून दिली, त्या बॅट आता सचिनप्रेमींना अगदी जवळून पाहता येणार आहेत.

‘सचिनमय’ कार्यक्रमाची सुरुवात

“मी बॅटसाठी कधी हट्ट केला नव्हता. माझी बहीण सविताने काश्मीरहून आणलेली बॅट मला भेट दिली आणि मला या खेळाचे वेड लागले. माझ्यासाठी एवढी अनमोल, सुंदर भेट कोणी आणू शकते, असे मला कधीच वाटले नव्हते. त्यानंतर बॅट आणि माझी जमलेली भागीदारी अभेद्य राहिली,” असे सचिन म्हणाले. याच किस्स्याने या ‘सचिनमय’ कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि या छोट्याशा मैफलीतून सचिन यांच्या कारकिर्दीतील अनेक खास आठवणींना उजाळा मिळाला.

दुसऱ्या हातात क्रिकेटची बॅट

“खरेतर लहानपणी मी सगळे क्रीडाप्रकार खेळलो आहे. अगदी बॅडमिंटनही. मात्र सहसा माझ्या एका हातात टेनिस रॅकेट आणि दुसऱ्या हातात क्रिकेटची बॅट असे. आम्ही आमच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर टेनिस चेंडूने क्रिकेट खेळायचो; पण जपून. कारण चेंडू जोरदार फटकावला, तर खाली जायचा,” असे सांगत सचिन तेंडुलकर यांनी आठवणींचा एक कप्पा उलगडला.

कादीर म्हणाले, ‘बच्चे को क्या मारता है?’

“माझ्या पहिल्या पाकिस्तान दौऱ्यातील बॅटही इथे आहे,” असे सचिन म्हणाले आणि त्यांनी त्या दौऱ्यातील एका प्रदर्शनीय सामन्याचा किस्सा सांगितला. “त्या सामन्यात मी फलंदाजीला आलो, तेव्हा माझ्या जोडीला श्रीकांत होते. त्यांनी मला या सामन्यात चांगला सराव करून घेण्याचा सल्ला दिला. त्या वेळी माझ्याच वयाच्या नवख्या गोलंदाजावर मी हल्ला चढवला होता तेव्हा महान अब्दुल कादीर माझ्याजवळ आले आणि म्हणाले, ‘त्या लहान पोराला काय मारतोस? हिंमत असेल तर माझ्या गोलंदाजीवर फटकेबाजी कर,’ असे सचिन यांनी सांगितले. “पण त्या वेळी मीदेखील खूप लहान होतो. मी कादीर यांना म्हटले, ‘तुम्ही खूप अनुभवी आणि यशस्वी आहात. तुमच्या गोलंदाजीवर बघू, मला फलंदाजी जमते का?’ मी त्यांच्या माऱ्यावरही फटकेबाजी केली. मात्र कादीर यांनी ते सगळे खिलाडूवृत्तीने म्हटले होते.” असे सचिन यांनी आवर्जून सांगितले.

 

तो कागदही संग्रहालयात

आपल्या निवृत्तीच्या भाषणाचे मुद्दे सचिन यांनी ज्या कागदावर टिपून ठेवले होते, तो कागदही या संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. सचिन आपल्या वस्तू आणि भाषणाचे मुद्दे लिहिलेला कागदही किती जपून ठेवतात, हे यावरून अधोरेखित झाले.

वर्षभराने मिळाली भेट

एमसीएने गेल्या वर्षी आपल्या क्रिकेट संग्रहालयासाठी तेंडुलकर यांच्याकडे काही वस्तू देण्याची विनंती केली होती. मात्र त्या वेळी तेंडुलकर यांच्या घरात लग्नाची लगबग सुरू होती. त्यासाठी त्यांच्या घराचे नूतनीकरणही सुरू होते. “खूप तयारी सुरू होती. घराचे नूतनीकरण सुरू असल्याने आम्हाला दोन वर्षे घरापासून दूर राहावे लागले. पण मी एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांना सांगितले होते की, मला थोडा वेळ द्या. मी तुम्हाला वचन देतो की संग्रहालयासाठी काहीतरी छान देईन,” असे सचिन यांनी सांगितले. एमसीएने आपल्या कारकिर्दीत खूप महत्त्वाची भूमिका बजावली, असे सांगत सचिन यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.

अन् सचिन तेंडुलकर भारावले

“तुम्ही मला असा बाऊन्सर टाकून भावूकच केले. मी आज ही माती घरी घेऊन जाणार आहे. माझे वानखेडे सोबत नेणार. वानखेडेची माती मला अशी भेट म्हणून मिळेल, असा मी कधी विचारही केला नव्हता,” असे म्हणताना सचिन तेंडुलकर यांना शब्दही अपुरे पडले. या सोहळ्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सचिन यांना वानखेडे स्टेडियमच्या आऊटफील्डचे गवत मानचिन्हाच्या स्वरूपात भेट दिले.

… म्हणून बॅटला स्टिकर नव्हते

“नव्वदच्या दशकात तंबाखू, सिगारेट आणि मद्य बनवणाऱ्या कंपन्या बॅटसाठी प्रायोजकत्व देत होत्या. मला मात्र त्यांच्या जाहिरातीत भाग घेऊन चुकीचा संदेश द्यायचा नव्हता. त्यामुळे मी काही महिने कोणत्याही प्रायोजकाविना बॅट वापरली. म्हणून त्या काळात तुम्हाला माझ्या बॅटवर स्टिकर दिसले नाही,” असे सचिन यांनी आवर्जून सांगितले.

वर्तुळ पूर्ण झाले

२७ नोव्हेंबर १९८३ : दहा वर्षांच्या सचिन यांनी सर्वप्रथम वानखेडे स्टेडियमवर पाऊल ठेवले.

त्यावेळीः सचिन भारत-वेस्ट इंडिज सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले होते.

आठवण : आपला लाडका क्रिकेटपटू व्हिवियन रिचर्ड्सचे त्या सामन्यातील शतक सचिन यांना आजही स्मरते.

१६ नोव्हेंबर २०१३ : वानखेडेवर, आपल्या २००व्या कसोटीत, वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यानंतर सचिन यांनी निवृत्ती स्वीकारली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *