स्वामींच्या दरबारात ‘भेसळी’चा प्रसाद! अक्कलकोटमध्ये FDAचा मिठाई विक्रेत्यांना दणका, 850 किलो मिठाईचा साठा जप्त, चार दुकानांना टाळे

श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने पेढा उत्पादक आणि मिठाई विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई केली आहे.

या कारवाईत अडीच लाखांचा एकूण ८५० किलो पेढा व मिठाईचा साठा जप्त करण्यात आला. तसेच चार आस्थापनांना व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, मुख्य पुरवठादाराचा अन्न परवाना आणि अन्य एका आस्थापनेची नोंदणी निलंबित करण्यात आली आहे.

एफडीए पथकाने अक्कलकोट येथील मुख्य मिठाई पुरवठादार रंगोली स्वीट मार्टचे समीर बडेसाहब मकानदार यांच्या आस्थापनेत अस्वच्छ परिस्थितीत साठवणूक , लेबलविषयक नियमांचे उल्लंघन, अन्न सुरक्षा व मानके नियमांतील तरतुदींचे उल्लंघन तसेच मिठाईचा दर्जा निकषांनुसार नसल्याचा संशय आढळून आला . या ठिकाणाहून ३९८ किलो कंदी पेढा आणि ४३१ किलो स्वीट हलवा असा एकूण ८२९ किलो साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत २ लाख ५० हजार २० रुपये आहे. या कारवाईमुळे अक्कलकोटमधील मिठाई उत्पादक, विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

चार दुकाने बंदचा आदेश

स्वामी समर्थ मंदिरासमोरील समर्थ स्वीट स्टॉल, पाटील स्वीट शॉप, रंगोली स्वीट मार्ट, सलीम मकानदार पेढा स्टॉल ही आस्थापने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय रंगोली स्वीट मार्ट, या मुख्य पुरवठादाराचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच मे . गुरुकृपा पूजा भंडार , स्वामी समर्थ मंदिरासमोर, अक्कलकोट या आस्थापनेची नोंदणी निलंबित करण्यात आली आहे. कंदी पेढा व स्वीट हलव्याचे नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. तसेच या आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे. ही कारवाई सहआयुक्त (अन्न) श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त एस. ई. देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी एखंडे आणि हिरेमठ यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *