महाराष्ट्राला हादरवणारा प्रकार, 12 वर्षात 6 नवजात बाळांची विक्री; डॉक्टर दाम्पत्याला अटक

अमरावतीच्या डॉक्टर वैशाली भोजने यांच्या रुग्णालयातून नवजात बाळ विकल्याच्या प्रकरणात धक्कादायक आणि मोठा खुलासा समोर आला असून डॉक्टर वैशाली भोजने यांनी बारा वर्षात सहा बाळ दुसऱ्यांच्या स्वाधीन केले असा धक्कादाय खुलासा पोलीस जबाबातून पुढे आला आहे. बाळ घेणाऱ्यांकडून पालकांना पन्नास हजार ते दीड लाखांपर्यंत रक्कम मिळाली असून अल्पवयीन मुलीची प्रसूती करून तिचे बाळ विकल्याचा गंभीर आरोप डॉक्टर वैशाली भोजने यांच्यावर आहे. बाळ विकल्यानंतर मिळालेली रक्कम जैविक पालकांना देण्यात आली मात्र आपण रक्कम न घेतल्याचा भोजने यांचा दावा असून भोजने दाम्पत्याला 20 नोव्हेंबर पर्यंत वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

अमरावती शहरातील साईनगर अकोली परिसरातून या दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आलं. एका अल्पवयीन मुलीची प्रसूती आपल्या खासगी रुग्णालयात करून तिच्या नवजात बाळाची तब्बल 3 लाख 50 हजार रुपयांत विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप या दाम्पत्यावर आहे. या प्रकरणात यापूर्वीच चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये बाळाच्या वडिलांचाही समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणामागील संपूर्ण साखळी आणि आणखी कोणाचा सहभाग आहे. याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

अमरावती शहरात 15 ऑक्टोबर रोजी उघडकीस आलेल्या नवजात बाळ विक्रीच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. एका अल्पवयीन मुलीची डॉ. वैशाली भोजने यांच्या रुग्णालयात प्रसूती करण्यात आली. मात्र प्रसूतीनंतर या नवजात बाळाची 3 लाख 50 हजार रुपयांत विक्री करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप समोर आला. या घटनेनंतर प्रशासन आणि पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. अमरावती महानगरपालिकेने संबंधित रुग्णालयाची तपासणी करून डॉ. भोजने दाम्पत्याच्या हॉस्पिटलला सील ठोकले. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. वैशाली भोजने आणि त्यांचे पती प्रफुल्ल भोजने हे फरार झाले होते. मात्र तब्बल 24 दिवसांपासून ते पोलिसांना सापडत नव्हते. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अमरावती शहरातील साईनगर-अकोली परिसरातून दोघांनाही अटक केली. या अटकेमुळे नवजात बाळ विक्रीच्या कथित प्रकरणातील तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे?

नवजात बाळाच्या विक्रीचा व्यवहार नेमका कुठे आणि कोणासोबत ठरला होता? 3 लाख 50 हजार रुपयांच्या कथित व्यवहारामागे आणखी काही व्यक्ती आहेत का? तसेच या संपूर्ण प्रकरणात रुग्णालयाची आणि संबंधित व्यक्तींची भूमिका काय होती? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासातून समोर येणार आहे एकीकडे अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीचा गंभीर मुद्दा तर दुसरीकडे नवजात बाळाच्या कथित विक्रीचा धक्कादायक प्रकार. या प्रकरणाने वैद्यकीय क्षेत्रातील विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

२४ दिवस फरार राहिल्यानंतर डॉ. भोजने दाम्पत्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले असले तरी या प्रकरणामागील संपूर्ण सत्य तपासातूनच समोर येणार आहे. आता पोलिसांच्या पुढील तपासाकडे संपूर्ण अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *