जुन्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी मोबाईल दुकानात घुसत एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याचा निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी सोलापूर जिल्ह्यातील दुधनी येथे घडली. दुकानात घुसून तरुणाला लाथाबुक्क्यांनी व चप्पलने मारहाण केल्यानंतर लोखंडी पाईपच्या साहाय्याने बेदम मारहाण करून त्याचा जीव घेतल्याची माहिती अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीत नमूद आहे. या घटनेत महेश धानप्पा गुड्डोडगी (वय ३०, रा. दुधनी ता अक्कलकोट, जि. सोलापूर) याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मयताचा भाऊ शिवकुमार धानप्पा गुड्डोडगी (वय ३२) यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
जुन्या भांडणाचा राग मनात धरून जीवघेणा हल्ला
गुरुवारी दुपारी ३ वाजून ५७ मिनिटांच्या सुमारास महेश गुड्डोडगी हा दुधनी नगरपालिकेच्या गाळ्यात असलेल्या शिवा मोबाईल शॉपी या दुकानात बसून मित्रांसोबत गप्पा मारत होता. यावेळी आरोपी सचिन बसवराज कौलगी व त्याच्यासोबत आलेल्या अन्य तीन अनोळखी तरुणांनी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून महेश याला लाथाबुक्क्यांनी तसेच चप्पलने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी सचिन कौलगी याने अचानक चाकू काढून तो लोखंडी पाईपमध्ये ठेवून त्याच पाईपने महेश याच्यावर जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात महेश याचा जागीच मृत्यू झाला आहे.
