गाढ झोपेत असताना काळाची झडप, नियंत्रण सुटल्याने बस थेट पुलाखाली; एकाचा मृत्यू, २० प्रवाशांची प्रकृती चिंताजनक

छत्रपती संभाजीनगर शहरात आज सकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. प्रवाशांना घेऊन पुण्याहून नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेली एक खासगी लक्झरी बस शहरातील केंब्रिज चौकाजवळील उड्डाणपुलाचा मजबूत कठडा तोडून थेट पुलाखाली कोसळली. या भयानक अपघातात एका प्रवाशाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे तर, २० पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

नेमका कसा झाला अपघात?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही खासगी ट्रॅव्हल्स बस प्रवाशांना घेऊन पुण्याहून नागपूरकडे जात होती. छत्रपती संभाजीनगर शहरातील केंब्रिज चौकाजवळील पुलावरून जात असताना चालकाचं बसवरील नियंत्रण अचानक सुटलं. वेग प्रचंड असल्यानं बस पुलाचा संरक्षक कठडा तोडून थेट खाली कोसळली. पहाटेच्या शांततेत झालेल्या या मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांमध्ये एकच हाहाकार

बस पुलावरून खाली कोसळताच बसमध्ये गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांमध्ये एकच हाहाकार माजला. बसचा अक्षरशः चक्काचूर झाला असून आतील प्रवासी मदतीसाठी आक्रोश करत होते. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू करत बसच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले. अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला, तर जखमी झालेल्या २० हून अधिक प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे.

समृद्धी’वर १९ वाहने चक्काचूर

समृद्धी महामार्गावर शुक्रवारी सकाळी विचित्र अपघात झाला. नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर कंटेनर उलटला. रस्ताच बंद झाल्याने त्याला बाजूला नेण्यासाठी वाहतूक थांबविण्यात आली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. एक भरधाव ट्रक मागून आला आणि त्याने रांगेतील मागच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की समोरची १९ वाहने चक्काचूर झाली.

सिमेंट मिक्सर ट्रक उलटला

सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीडजवळ, तढेगाव परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने सकाळी ६.४५ च्या सुमारास सिमेंट मिक्सर ट्रक उलटला. भर रस्त्यात हा मिक्सर आडवा झाला. चार तासांनी या ट्रकला बाजूला करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मुंबईकडे जाणाऱ्या तिन्ही लेन बंद झाल्या. पोलिसांनी ही बाजू वाहतुकीसाठी बंद केली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ११.२० च्या सुमारास एक ट्रक सुसाट वेगाने आला. समोर रस्ता बंद आहे आणि वाहनांची रांग लागली आहे, याची त्याला कल्पना नसावी. त्याने पुढील वाहनाला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती, की समोरील उभ्या १९ गाड्यांना जबर हादरा बसला. या धडकेने कार एकमेकांवर आदळल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *