फटाक्यावरुन रिक्षाचं चाक गेलं, दोघांकडून वडिलांना मारहाण, लेक वाचवण्यासाठी धावली आणि नको ते झालं; पुण्यात काय घडलं?

पुण्यात गुन्हेगारीच्या घटना घडणं म्हणजे आता काय नवीन नाही. रोज काही ना काही आणि कोणत्याही कारणावरुन किंवा थेट हत्येच्या घटना घडत असतात. अशीच एक घटना पुण्यातील नाना पेठ परिसरात घडली आहे. फटाके वाजवण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर भीषण हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिक्षाचं चाक फटाक्यावरून गेल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादातून एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आल्यानं ती गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, इतर आरोपींविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

आकांक्षा नितीन साळवे (वय 21) असं या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचं नाव असून, तिचे वडील नितीन गिरधारी साळवे यांनी या प्रकाराबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी विनायक अतिश कांबळे (वय 26) आणि आर्यन विजय शिंदे (वय 18) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, मुख्य आरोपी संदेश संजय जाधव (वय 30) आणि त्याच्या इतर साथीदारांवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फटाक्यावरुन रिक्षाचं चाक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन साळवे हे रिक्षाचालक आहेत. दिवाळीनिमित्त नातेवाईकांना भेटून ते आपल्या पत्नी आणि मुलीसह घरी परतत होते. त्यांच्याच इमारतीत राहणारे संजय जाधव आणि त्यांचा जावई आकाश ऊर्फ ऋषी उबाळे हे रस्त्यावर फटाके फोडत होते. यावेळी उबाळे याने लावलेल्या फटाक्यावरून साळवे यांच्या रिक्षाचं चाक चुकून गेलं. या क्षुल्लक कारणावरून उबाळे याने साळवे यांना शिवीगाळ करत जबर मारहाण केली. मात्र, त्यावेळी हा वाद मिटल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघून गेले.

‘आपल्या दाजीसोबत फटाक्यावरून याचेच भांडण झाले होते’

यानंतर 9 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास नितीन साळवे हे घराजवळील होप हॉस्पिटल परिसरात उभे होते. तिथे संजय जाधव यांचा मुलगा संदेश जाधव आणि त्याचे तीन मित्र थांबलेले होते. साळवे यांना पाहताच संदेशने आपल्या मित्रांना ‘आपल्या दाजीसोबत फटाक्यावरून याचेच भांडण झाले होते,’ असं सांगितलं आणि ते सर्वजण साळवे यांच्याजवळ आले. त्यांनी साळवे यांना पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली.

लेकीच्या डोक्यात वर्मी घाव बसला

आरडाओरडा ऐकून भांडण सोडवण्यासाठी साळवे यांची पत्नी, दोन्ही मुली आणि भाचा घटनास्थळी धावले. याच गोंधळात संदेश जाधवसोबत असलेल्या विनायक कांबळे याने आपल्याकडील धारदार शस्त्र काढून नितीन साळवे यांच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. वडिलांना वाचवण्यासाठी मुलगी आकांक्षा मध्ये पडली असता, तो वर्मी वार थेट तिच्या डोक्यात बसला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने आकांक्षा जागीच बेशुद्ध पडली. तिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून संदेश जाधव आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या आकांक्षावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *