वडिलांनी मोबाईलसाठी पैसे दिले नाही, पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाला…; धाराशिवमध्ये भयंकर प्रकार

मोबाईलसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने केला वडिलांचा खून केल्याची घटना घडली आहे.  धाराशिवच्या येवती येथील ही धक्कादायक घटना असून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेने मोबईलच्या व्यसनापायी जन्मदात्या पित्याचा निर्घृणपणे हत्या झाल्याने माणुसकीला काळिमा फासल्याची चर्चा होताना दिसत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मोबाईल घेण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलानेच जन्मदात्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी फुकारीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील येवती येथे घडली. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, येवती येथे 10 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास श्रीशैल उर्फ बबलू खंडू डोंबाळे (वय 29, रा. येवती, ता. तुळजापूर) याने मोबाईल घेण्यासाठी वडिलांनी पैसे न दिल्याचा राग मनात धरून वडील खंडू पांडुरंग डोंबाळे (वय 56) यांच्या डोक्यात लोखंडी फुकारीने जोरदार वार केले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या खंडू डोंबाळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरेखा खंडू डोंबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीशैल उर्फ बबलू खंडू डोंबाळे याच्याविरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे करीत आहेत.

सर्वत्र दिवाळीचा सण आनंदात साजरा होत असताना केवळ मोबाईल घेण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मुलानेच वडिलांचा खून केल्याची घटना समोर आल्याने येवती परिसरात खळबळ उडाली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, क्षुल्लक कारणातून घडलेल्या या घटनेने कौटुंबिक नात्यांमधील वाढत्या संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *