मॅट्रिमोनिअल साइटवरुन वर-वधू शोधताय? सावधान; नवी मुंबईतील 30 वर्षीय तरुणीला साडेपाच लाखांचा गंडा

विवाहासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात असलेल्या उरणमधील ३० वर्षीय तरुणीला मॅट्रिमोनिअल साइटवरून संपर्क साधणाऱ्या सायबरचोरांनी पाच लाख ५२ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यूकेमध्ये वास्तव्यास असल्याचे भासवून आरोपीने तरुणीशी ओळख वाढवली. त्यानंतर परदेशातून दोन लाख पौंड आणि २५ हजार डॉलरचे पार्सल पाठवल्याचे सांगून दिल्ली कस्टम, अँटी मनी लाँड्रिंग आणि विविध सरकारी शुल्कांच्या नावाखाली तिच्याकडून पैसे उकळण्यात आले. या प्रकरणी उरण पोलिसांनी सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

तक्रारदार तरुणी उरण येथे राहते. तिने सप्टेंबर महिन्यात शादी डॉट कॉम या विवाहविषयक वेबसाइटवर नोंदणी केली होती. याचदरम्यान एका सायबरचोराने अविराज देशपांडे या नावाने तिच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला. आपण यूकेमध्ये राहत असल्याचे सांगत त्याने तिचा विश्वास संपादन केला. तसेच, ६ ऑक्टोबर रोजी भारतात येत असल्याचेही सांगितले. यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्ली विमानतळावरील कस्टम अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या कृतीका राय नावाच्या व्यक्तीने तरुणीला फोन केला. अविराज देशपांडे याच्याकडे यूकेमधून आलेला दोन लाख पौंडांचा डिमांड ड्राफ्ट असून, त्याच्या नोंदणीसाठी ५५ हजार ५०० रुपये भरावे लागतील, असे तिला सांगण्यात आले. त्यानुसार तरुणीने ही रक्कम पाठवली.

यानंतर आरोपींनी अँटी मनी लाँड्रिंग प्रमाणपत्र, फॉरेन एक्स्चेंज क्लिअरन्स, कायदेशीर मालकी हस्तांतरण, इंटरनॅशनल मॉनेटरी फंड, करन्सी डिक्लेरेशन आणि विलंब शुल्क अशी वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून आणखी पैसे उकळले. यानंतर अविराज नावाच्या व्यक्तीने २५ हजार डॉलरची रोख रक्कम असलेले पार्सल पाठवल्याचे सांगितले.

हे पार्सल जम्मू-काश्मीर विमानतळावर कस्टम विभागाने पकडल्याचा बनाव करण्यात आला. त्यानंतर गुरसेल नावाच्या व्यक्तीने तरुणीशी संपर्क साधून विविध प्रमाणपत्रे, डिप्लोमॅटिक पासेज परमिट आणि विमा शुल्काच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. पैसे पाठवूनही पार्सल मिळत नसल्याने तरुणीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने प्रथम सायबर हेल्पलाइनवर आणि नंतर उरण पोलिसांत तक्रार दाखल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *