मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासह पर्यावरणपूरक प्रवासाला चालना देण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात तब्बल १,५०० नवीन वातानुकूलित इलेक्ट्रिक मिडी बस दाखल होणार आहेत. केंद्र सरकारच्या ‘पीएम ई-ड्राइव्ह’ योजनेअंतर्गत या बस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी बेस्टने करार केला आहे. त्यामुळे बेस्टच्या ताफ्यात वाढ होण्याबरोबरच प्रवाशांना अधिक आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
मेट्रो मार्गांवरील स्थानके तसेच भविष्यात सुरू होणाऱ्या मेट्रो स्थानकांपर्यंत प्रवाशांना ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ देण्यासाठी या बसांचा वापर करण्यात येणार आहे. अरुंद आणि गर्दीच्या रस्त्यांवर या मिडी बस धावू शकणार आहेत. मेसर्स मुंबई विद्युत वाहन ऑपरेशन प्रा. लि. यांच्याकडून १,०५० बस, तर मेसर्स साईग्रीन इव्हीएम प्रा. लि. यांच्याकडून ४५० बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या बस ९ मीटर लांबीच्या असून पूर्णपणे वातानुकूलित असतील.
अशी असेल रचना
नवीन बसमध्ये ४०० मिमी उंचीचा ‘अल्ट्रा लो’ प्रवेशद्वार, दिव्यांग प्रवाशांसाठी स्वयंचलित रॅम्पची सुविधा असेल. प्रत्येक बसमध्ये २८ प्रवाशांसाठी आसनव्यवस्था असून दिव्यांग प्रवाशासाठी व्हीलचेअरसाठी जागेची स्वतंत्र व्यवस्था आहे. एका चार्जमध्ये किमान २०० किलोमीटर धावण्याची क्षमता, छतावर आणि मागील बाजूस मॉड्युलर बॅटरी, पुढील व मागील बाजूस पूर्ण एअर सस्पेन्शन अशी व्यवस्था आहे. फायर डिटेक्शन अँड सप्रेशन सिस्टीम, सीसीटीव्ही, लाइव्ह जीपीएस ट्रॅकिंग, प्रत्येक आसनाजवळ जलद यूएसबी चार्जिंग सुविधा यात असेल. १२ वर्षांच्या ‘कन्सेशन ॲग्रिमेंट’अंतर्गत प्रत्येक बस वर्षाला ६४ हजार किमी धावेल, असे निश्चित करण्यात आले आहे.
मार्ग निश्चित करणार
या १,५०० बसांसाठी आगार आणि बसमार्ग निश्चित करण्यात येणार असून बसवरील जाहिरातींतून मिळणारे उत्पन्नही बेस्टला प्राप्त होईल. नव्या इलेक्ट्रिक मिडी बसांमुळे मुंबईकरांना आरामदायी, जलद, पर्यावरणस्नेही आणि सुरक्षित बसप्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल, असा विश्वास बेस्टने व्यक्त केला आहे. बेस्ट उपक्रमाच्या बस ताफ्यात मार्च २०२७ पर्यंत २२५ बसगाड्या आणि उर्वरित बस गाडयांचा समावेश मार्च २०२८ पर्यंत टप्प्याटप्याने केला जाणार आहे.
