राज्यात राजकारणात सध्या आता, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही? शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार का? अशा चर्चांना राज्यात उधाण आलं आहे. विलिनीकरणात येत असलेल्या अडचणींचा विचार करता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाऐवजी स्वतंत्र पक्ष म्हणून सत्तेत जाण्याच्या पर्यायावर चर्चा असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा अक्षरश: फेटाळून लावल्या आहेत.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
‘विलिनीकरणाच्या चर्चांचा मला आता कंटाळा आला आहे. माझा भाऊ (अजित पवार) होता तोपर्यंत विलिनीकरणाची चर्चा होती, तारीखही ठरली होती. ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात या विषयाला फुलस्टॉप लागला’, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. ‘ज्या दिवशी संघटनेतील पदाधिकारी आणि माझा अजितदादा यांच्याशी चर्चा झाली होती. त्याचे व्हिडीओ पण तुम्ही दाखवले. माझा भाऊ होता तोपर्यंत विलिनीकरणाची चर्चा होती. ज्या दिवशी भाऊ गेला त्या दिवशी विलिनीकरणाला फुलस्टॉप लागला. आमच्याकडून एकही स्टेटमेंट नंतर गेलेलं नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जे स्टेटमेंट आली आहेत, त्याला आम्ही काऊंटर केलेलं नाही. जे आमचं पुढे जायचं ठरलं होतं, ते अजितदादांसोबत ठरलं होतं. काही गोष्टी हृदयातूनही होतात’, असंही सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितलं. ‘विलिनीकरणाच्या चर्चांवर आज जे काही आहे, ते प्रश्न विचारुन टाका, आज काय ते होऊन जाऊ द्या. यापुढे मी विलिनीकरणावर बोलणार नाही. या चर्चांवरुन मला कंटाळा आला आहे’, असं रोखठोक भाष्य सुप्रिया सुळेंनी केलं आहे.
