अनैतिक संबंधांच्या वादानं अखेर रक्तरंजित वळण घेतलं. जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई येथे काल शुक्रवारी सकाळी भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या ४० वर्षीय रावसाहेब मच्छिंद्र पंडित यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात, शिंगणापूर कमानीजवळ घडलेल्या या थरारक घटनेनं सोनई हादरलं आहे. मृताचं ज्या महिलेशी प्रेमसंबंध होते, तिच्याच मुलाने एका साथीदारासह हा हल्ला केला, असं सांगितलं जात आहे.
दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू
घटनेनंतर पसार झालेल्या मुख्य आरोपीला सोनई पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. रावसाहेब पंडित हे मालवाहतूक वाहन चालवून शेतमजुरांची ने-आण करण्याचं काम करत होते. या कामादरम्यान त्यांची गावातील एका महिलेशी ओळख झाली. पुढे या ओळखीचं रूपांतर प्रेमसंबंधांत झालं. मात्र या संबंधांची कुणकुण महिलेच्या मुलाला लागताच घरातील वादाला सुरुवात झाली. संबंधित संबंध संपवावेत यासाठी मुलाने रावसाहेब यांना वारंवार समज दिली होती. परंतु त्यानंतरही संबंध सुरूच राहिल्यानं मुलाच्या मनात संताप वाढत गेल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
रावसाहेब यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार
काल शुक्रवारी सकाळी सुमारे ११.४० वाजता रावसाहेब पंडित हे आंबेडकर चौकात आपल्या वाहनाजवळ उभे होते. याचवेळी महिलेचा मुलगा आणि त्याचा एक साथीदार दुचाकीवरून तेथे दाखल झाले. काही क्षणातच त्यांनी रावसाहेब यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. भरचौकात अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रावसाहेब यांना गंभीर अवस्थेत सोडून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांचे चुलतभाऊ कैलास मंजाबापू पंडित यांनी त्यांना तातडीने सोनई येथील रुग्णालयात दाखल केलं. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं.
दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल
या प्रकरणी मृताचा लहान भाऊ दीपक पंडित (वय ३६) यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेगाने तपास करत मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून हत्येचा संपूर्ण घटनाक्रम उघड करण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. समज देऊनही न थांबलेले संबंध, वाढत गेलेला संताप आणि अखेर भरचौकात झालेला रक्तपात, सोनईतील या हत्याकांडानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. घटनेचा पुढील तपास सोनई पोलीस ठाणे करत आहे.
