गोरेगाव पूर्व भागातील दिंडोशी परिसरातील एका इमारतीत दहा वर्षांच्या मुलीने १८ महिन्यांच्या चिमुकलीला सहाव्या मजल्यावरुन मोकळ्या डक्टमध्ये फेकल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना १४ ऑक्टोबरच्या रात्री घडली होती. ज्या बालिकेवर खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे, तिच्या आईने कदाचित हे कारस्थान रचले असावे, जेणेकरुन आम्हाला ती जागा रिकामी करायला भाग पाडता येईल, असा संशय पीडित कुटुंबाने व्यक्त केला आहे.
मयत मुलीच्या वडिलांचा आरोप आहे की, ज्या अल्पवयीन मुलीवर संशय व्यक्त केला जात आहे, तिच्या आईने कट रचला असावा. संशयित अल्पवयीन मुलीचे कुटुंब आता तिथून निघून गेले आहे, परंतु ते पोलिसांच्या संपर्कात असल्याचे समजते. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
पीडित कुटुंब १ ऑक्टोबर रोजी ‘नागरी निवारा’ परिसरामधील या इमारतीत राहायला आलं होतं. ते संशयित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहत होतं. नातेवाईकांचा आरोप आहे की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये लहान मुलीला डक्टमध्ये फेकून दिले जात असल्याचं दिसत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर संशयित अल्पवयीन मुलगी सहाव्या मजल्यावरील स्वतःच्या घरात जातानाही दिसत आहे. नंतर ती पुन्हा सायकल चालवताना दिसते. पीडित कुटुंबाने सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या आणखी एका मुलीच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मयत मुलीचे पिता काय म्हणाले?
मयत मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी अपघाताने पडली असावी, या सुरुवातीच्या दाव्यावर त्यांना विश्वासच बसला नाही, कारण ती इतकी लहान होती की ती पॅरापेटवर (भिंतीच्या कठड्यावर) चढूच शकत नव्हती. ते म्हणाले, “रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मला समजले की माझी मुलगी खाली पडली आहे आणि तिला दुखापत झाली आहे. मी आणि माझी पत्नी तातडीने रुग्णालयात पोहोचलो, तिथे आम्हाला सांगण्यात आलं, की ती आता या जगात राहिली नाही. त्यानंतर आम्हाला पोलीस चौकीत पाठवण्यात आलं. माझी मुलगी अवघी दीड फूट उंच होती. ती इतक्या उंचावर कशी चढू शकते आणि तिथून कशी पडू शकते?” त्यांनी असाही आरोप केला की, नातेवाईकांनी हस्तक्षेप केल्यानंतरच पोलीस कारवाईला वेग आला; त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला आणि इमारत तसेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
सायकलवरून वाद
मुलीच्या वडिलांना संशय आहे की, त्यांच्या मोठ्या मुलाच्या सायकलवरून झालेल्या वादामुळे ही घटना घडली असावी. त्यांनी सांगितलं की, शेजाऱ्यांनी सायकलमुळे अडचण होत असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर त्यांचा मुलगा ती सायकल फ्लॅटच्या मुख्य दाराच्या सेफ्टी डोअरसमोरुन हटवण्यास तयार झाला. त्यानंतर त्यांनी ती सायकल खिडकीजवळ हलवली होती.
“मला वाटतं की, ती बाई आणि तिचा नवरा आम्हाला ही जागा सोडून जाण्यास सांगत होते. त्यांना असे वाटलं असावं की, जर काही दुर्घटना घडली, तर आम्ही घर सोडून निघून जाऊ आणि त्यांना तिथे आरामात राहता येईल. आम्ही १ ऑक्टोबरलाच इथे राहायला आलो होतो, मग अवघ्या १३ दिवसांत इतका द्वेष कसा निर्माण होऊ शकतो? आमची मुलं तर घराबाहेरही फारशी जात नाहीत” असा आरोप त्यांनी केला. त्यांनी असाही दावा केला की, संशयित अल्पवयीन मुलीच्या आईनेच कदाचित तिला त्या लहान मुलीला खाली फेकून देण्यास सांगितलं असावं.
