महाराष्ट्रातील कर्जत-भीमाशंकरमधील टोरेंट प्रकल्पाला विरोध होत असताना आता साताऱ्यातील अदानीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प दुहेरी अडचणीत सापडला आहे. सातारा जिल्ह्यातील तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाच्या अडचणी वाढताना दिसून येत आहे. यापूर्वी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने कंपनीला प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या प्रकल्पाला काम बंद करण्याचे आदेश देत मोठा दणका दिला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितलं की, प्रकल्पावर आवश्यक परवानगी आणि पर्यावरणीय मंजुरीशिवाय काम सुरू असल्याचे समोर आलंय. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्खनन आणि बांधकामाची कामे तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मौजे सावरघर इथल्या गट क्रमांक 33 आणि 34 मध्ये पाहणी केली. तेव्हा असं दिसून आलं की, आवश्यक परवानग्यांशिवाय उत्खनन आणि विकासकाम सुरू आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली तसंच प्रस्तावित उत्खनन आणि बांधकामाची कामे तात्काळ बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत.
