मैत्रिणीनेच पार्टीला बोलावलं, जबरदस्तीने मद्यप्राशन, अल्पवयीन मुलीसोबत मित्रांकडून रात्रभर संतापजनक कृत्य, सोन्याची चैनही चोरली; ठाण्यात खळबळ

मिरा रोड काशिगाव परिसरातून एक अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे. पार्टीला जाण्याच्या बहाण्याने मैत्रिणीने बोलावलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी मिळून सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढंच नव्हे तर आरोपींनी पीडित मुलीच्या गळ्यातील 5 ग्रॅम वजनाची सोन्याची चैनही काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तपास सुरु केला. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या मैत्रिणीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला तिच्या महिला मैत्रिणीने मिरा रोड येथे पार्टीसाठी बोलावलं होतं. यावेळी दोन तरुणांनी तिला जबरदस्तीने मद्यप्राशन करण्यास भाग पाडलं. त्यानंतर तिच्यावर रात्रभर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याचदरम्यान आरोपींनी तिच्या गळ्यातील 5 ग्रॅम सोन्याची चैनही काढून घेतली. दरम्यान, रात्र संपूनही लेक घरी परतली नसल्यानं कुटुंबीयांना चिंता वाटू लागली आणि तिचा शोध सुरू केला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे मिरा रोड परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *