महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला आहे. ऐन हिवाळ्यातच अनेक जिल्ह्यातील विहिरींनी तळ गाठला आहे. तर अनेक नद्या कोरडाठाक पडल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने शेतीलाही मोठा फटका बसला आहे. रब्बी हंगामातील पेरणीच्या आकडेवारीची तुलना करता 1972 च्या दुष्काळापेक्षाही यंदाचा दुष्काळ भीषण ठरला आहे.
राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात एकूण 310 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 19 नोव्हेंबर 2026 रोजी राज्य सरकारने आधीच्या 304 दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 6 तालुक्यांचा समावेश केला आहे. प्रशांत महासागरात सक्रीय असलेला एल निनो हा सुपर म्हणजेच शक्तीशाली एल निनो असल्याचे जाहीर केले आहे. मोसमी पावसावर एल निनोचा थेट परिणाम झाल्यामुळे राज्यात सरासरीच्या तुलनेत 19 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे
पाऊसच कमी झाल्याने राज्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. पाणीच नसल्याने पेरण्यादेखील कमी झाल्या आहेत. 1972-73च्या हंगामात 47.29 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा आजअखेर 14 लाख 74 हजार 304 हेक्टरवर पेरणी झाली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत पेरण्या होतात, त्यामुळे यंदा जेमतेम 20 ते 25 लाख हेक्टरपर्यंत पेरणीचा अंदाज आहे. राज्याच्या रब्बी हंगामाच्या इतिहासातील ही सर्वात कमी पेरणी ठरण्याची भीती आहे.
कृषी विभागाकडे 1960 पासूनची रब्बी हंगामातील पेरणीची आकडेवारी आहे. पेरणी क्षेत्राची तुलना करता, यंदाचा दुष्काळ आजवरचा सर्वात भीषण ठरला आहे. राज्यातील रब्बी हंगामातील सरासरी पेरणी क्षेत्र 55 ते 60 लाख हेक्टर आहे. 1972-73च्या हंगामात एकूण 47.29 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यात अन्नधान्य पिके 36.64, कडधान्य पिके 4.31 आणि तेलबियांची 6.34 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती.
यंदा आजवर 14 लाख 74 हजार 304 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात अन्नधान्य पिके 7 लाख 79 हजार 812 हेक्टर, कडधान्यांची 6 लाख 78 हजार 385 हेक्टर आणि तेलबियांची 16 हजार 106 हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा डिसेंबरअखेर पेरण्या होतील. पण, एकूण रब्बी पेरा 20 ते 25 लाख हेक्टरच्या वर जाण्याची कोणतीही शक्यता नाही. राज्याच्या इतिहासात आजवरच्या कमी पेर्याची नोंद 1991-92 च्या हंगामात झाली होती, त्या वर्षी 40 लाख हेक्टरवर पेरा झाला होता.
कार्तिकी एकादशीवर दुष्काळाचे सावट
आज पंढरपूरमध्ये कार्तिक एकादशीचा सोहळा साजरा होत आहे. कार्तिकी एकादशीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपुरमध्ये दाखल झाले. दुष्काळाचे सावट या वारीवर असल्यामुळे भाविकांच्या संख्येमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळते. आज पहाटेपासूनच चंद्रभागेमध्ये स्नानासाठी भाविकांनी गर्दी केलेल्या चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करून हे भाविक विठुरायाच्या पदस्पर्श आणि मुखदर्शन रांगेमध्ये जात असतात संपूर्ण वाळवंट हे भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे चित्र पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पात्रात दिसते.
