भाडेतत्त्वावरील बसना ‘ब्रेक’! बेस्टच्या 5 हजार स्वमालकीच्या बस धावणार, अर्थसंकल्पात महत्त्वाकांक्षी आराखडा

खासगी कंत्राटदारांच्या वेट लीज बसवर अवलंबून असलेल्या बेस्ट उपक्रमाने नव्याने भाडेतत्त्वावर बस घेण्याऐवजी पाच हजार स्वमालकीच्या बस खरेदी करून त्या स्वतःच्या नियंत्रणाखाली चालवण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबईतील २७ बस आगारांचा पुनर्विकास करून सुमारे २८ हजार कोटी रुपये उभारण्याचे नियोजन आहे. या निधीतून प्रथम कर्मचाऱ्यांची थकीत देणी चुकती केली जाणार असून, त्यानंतर बस खरेदी आणि कर्मचाऱ्यांसाठी १० हजार घरे उभारण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.

बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी बेस्ट समितीच्या अर्थसंकल्पीय चर्चेत हा आराखडा मांडला. बेस्ट उपक्रमाचा २०२६-२७चा सुधारित आणि २०२७-२८चा मूळ अर्थसंकल्प शुक्रवारी बेस्ट समितीत सादर करण्यात आला. सुधारित अर्थसंकल्पात परिवहन विभागाची तूट २९.२१ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा प्रशासनाने केला. परिवहन विभागाचे उत्पन्न २०२६-२७मध्ये २,२४०.९४ कोटी रुपये अपेक्षित असून, २०२७-२८मध्ये ते ३,५५१.५५ कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे.

एकेकाळी मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या बसची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या बेस्टकडे अवघ्या २४९ स्वमालकीच्या बस असून, दोन हजार ६२८ बस भाडेतत्त्वावर चालवल्या जात आहेत. खासगी कंत्राटदारांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी बेस्टने पाच हजार स्वमालकीच्या बसचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, केंद्राच्या ‘पीएम ई-ड्राइव्ह’अंतर्गत मंजूर एक हजार ५०० इलेक्ट्रिक बस या निर्णयाला अपवाद असतील.

बस खरेदीसाठी आवश्यक निधी उभारण्यासाठी बेस्टने स्वतःच्या मालमत्तांच्या पुनर्विकासाचा पर्याय निवडला आहे. २७ बस आगारांच्या पुनर्विकासातून अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांकाचा वापर करून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण केले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *