‘आई हाक मारत राहिली पण लेक उठलीच नाही’, नूडल्स खाल्ल्यानंतर 7 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!

राजस्थानची राजधानी जयपूरमधील झोटवाडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात बनवलेले नूडल्स खाल्ल्यानंतर सात वर्षांच्या पीहू कुमावत या मुलीचा मृत्यू झाला. तिच्या मोठ्या बहिणीची प्रकृतीही बिघडली होती. उपचारानंतर तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी मंगलम सिटी परिसरात घडली. प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

आई घरी परतली तेव्हा पीहू उठलीच नाही

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बहिणींनी घरी नूडल्स खाल्ले आणि त्यानंतर त्या झोपल्या. काही वेळाने आई घरी परतली आणि तिने दोघींना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठी बहीण दिव्यांशी उठली; मात्र पीहूने कोणताही प्रतिसाद दिला नाही. तिची अवस्था पाहून कुटुंबीय घाबरले. त्यांनी दोन्ही मुलींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीनंतर पीहूला मृत घोषित केले. दिव्यांशीची प्रकृतीही बिघडल्याने तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी तिला रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

फूड पॉइझनिंगचा संशय

या घटनेनंतर करधनी पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास सुरू केला आहे. प्राथमिक परिस्थिती पाहता अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पीहूच्या आईने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. घरात खाल्लेल्या नूडल्सचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच पीहूच्या मृतदेहाचे वैद्यकीय मंडळामार्फत शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती वृत्तांत देण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल आणि नूडल्सच्या नमुन्यांची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.

भाऊ दोन महिन्यांपासून रुग्णालयात

या घटनेमुळे कुमावत कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. पीहूचा भाऊ गोविंद गेल्या दोन महिन्यांपासून आजारी असून रुग्णालयात दाखल आहे. त्याच्या उपचारांसाठी कुटुंबीयांची धावपळ सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. पीहूच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

नूडल्समुळेच मृत्यू झाला का?

घरात बनवलेले अन्न खाल्ल्यानंतर दोन्ही बहिणींची प्रकृती बिघडल्याने अन्न दूषित होते का, ते योग्य प्रकारे शिजवले होते का किंवा इतर कोणते कारण होते, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. अन्नाच्या नमुन्यांची प्रयोगशाळेतील तपासणी आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळू शकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *