महालक्ष्मी रेसकोर्सवरील प्रस्तावित सेंट्रल पार्कमध्ये आता केवळ उद्यानच उभारले जाणार आहे. या प्रकल्पातील भूमिगत इनडोअर खेळ, जिम, पार्किंग, कॉन्फरन्स हॉल अशा सुविधांना मुंबई महापालिकेने ब्रेक लावला आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सुधारित प्रस्तावाला मंजुरी दिली असून, रेसकोर्सवरील १२० एकर जागेत उद्यान विकसित करण्याची जबाबदारी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे सोपविण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या मदतीने महापालिकेने महालक्ष्मी रेसकोर्समधील २११ एकरपैकी १२० एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्याची योजना आखली आहे. या प्रकल्पाला मार्च २०२४मध्ये राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली होती. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या सदस्यांमध्ये झालेल्या मतदानातही ७६ टक्के सदस्यांनी सेंट्रल पार्कसाठी मंजुरी दिली होती. त्यानंतर या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
