एकनाथ शिंदेंचं ठाण्यात धक्कातंत्र; स्थायी समितीत नवा गडी, नवं राज्य

 ठाणे महापालिकेत सत्ता स्थापना होऊन तब्बल दहा महिन्यांचा कालावधी उलटूनही रखडलेल्या स्थायी समिती सदस्यांची अखेर शुक्रवारी निवड करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या सदस्य निवडीत प्रस्थापितांना धक्का देत नव्या चेहऱ्यांची वर्णी लागली. विशेष म्हणजे, स्थायी समितीत महिला सदस्यांची लक्षणीय संख्या पाहता महापौर पदानंतर या ठिकाणीही सभापतीपदी महिला सदस्याला संधी मिळाल्यास पुन्हा एकदा धक्कातंत्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या समितीच्या सदस्यपदाच्या शर्यतीत असलेल्या प्रस्थापित दिग्ग्ज सदस्यांना डावलून शिवसेनेच्या नेतृत्वाने नवीन सदस्यांच्या हाती धुरा सोपवल्याने ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीत ‘नवा गडी, नवं राज्य’ सुरु होणार आहे.

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीसह विविध विषय समित्यांची निवड रखडली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शुक्रवारी झालेल्या महासभेत स्थायी समितीच्या 16 सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवडीत सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेकडून ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बारटक्के, राजेश मोरे, पवन कदम, बाबाजी पाटील, महेश साळवी, संध्या मोरे, प्रमिला केणी, विक्रांत तांडेल आणि आदेश भगत या नऊ जणांची सदस्यपदी निवड केली.

भाजपकडून कमल चौधरी, भरत चव्हाण आणि मृणाल पेंडसे यांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने यासिन कुरेशी व पल्लवी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसने सुहास देसाई तसेच एमआयएमने शोहेब डोंगरे यांची या समितीच्या सदस्यपदी निवड केली. या सदस्य निवडीत शहराच्या प्रत्येक विभागातील सदस्यांना सामावून घेत सर्वसमावेशक पद्धतीनुसार प्रतिनिधी निवड करण्यात आली आहे.

दिग्ग्जांच्या स्वप्नांना सुरुंग

शिवसेनेत पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्थापितांना धक्का देत ज्येष्ठ, अनुभवी, तरुण चेहऱ्यासह महिलांना संधी दिली आहे. भाजपनेही तीन सदस्यांच्या निवडीत दोन महिलांसह ठाणे पूर्वेत कमळ फुलवणाऱ्या भरत चव्हाण यांची निवड केली. राष्ट्रवादीच्या (शप) नेतृत्वाने त्यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्र्याला झुकते माप देत या भागामधील नगरसेवकांची सदस्यपदी निवड केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *