राज्यभरात अन्न आणि औषध प्रशासनाकडून कडक कारवाई केली जात आहे. आता अन्न आणि औषध प्रशासनाकडून नाशिकमध्येदेखील कडक कारवाई केली जात आहे. नाशिकची मिसळ ही जगप्रसिद्ध आहे. अनेक खवय्ये नाशिकला काही कारणास्तव आले तर ते नाशिकच्या मिसळची चव घेतल्याशिवाय राहत नाहीत. चांगली चव लागते म्हणून आपण ती मिसळ खातो. पण ही मिसळ बनवताना अन्न सुरक्षा नियमांचे पालन केले जाते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण अन्न आणि औषध प्रशासनाने या प्रकरणी केलेल्या कारवाईत नाशिकमधील चार हॉटेल्सचे अन्न सुरक्षा परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
झणझणीत तर्री आणि खमंग चवीसाठी राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या मिसळसह विविध खाद्यपदार्थांच्या विक्रीमागील अस्वच्छतेचे वास्तव अन्न व औषध प्रशासनाच्या धडक तपासणीतून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांची पायमल्ली करणाऱ्या शहरातील चार अन्न आस्थापनांचे परवाने आणि एका आस्थापनाची नोंदणी प्रमाणपत्र एफडीएने एकाच दिवसात तात्काळ निलंबित केले आहे. या कारवाईमुळे खवय्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे नाशिकची मिसळ आणि खाद्यसंस्कृती आता प्रशासनाच्या रडारवर आल्याचे स्पष्ट झाले आहे.
