सुईधाग्याने दिली आयुष्याला ओळख, आव्हानांवर मात करत उघडली गारमेंट फॅक्टरी, कोण आहेत नागपूरच्या पायल चोपडा?

आयटी क्षेत्रातील शिक्षण, हातात इंजिनीअरिंगची पदवी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या… सामान्यतः या टप्प्यावर अनेक महिला आपल्या करिअरशी तडजोड करतात. पायल कुशल चोपडा यांनी आपल्या तांत्रिक शिक्षणाला उद्यमशीलतेची जोड देत उद्योजिका होण्याचे स्वप्न साकार केले. २०२१मध्ये सुरू केलेल्या नवउषा गारमेंट्स एलएलपी या उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी आज कोट्यवधींची वार्षिक उलाढाल गाठली आहे.

पायल चोपडा यांनी संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षणानंतर स्वतःचा काहीतरी उद्योग उभा करावा आणि त्याद्वारे इतरांना रोजगार द्यावा अशी त्यांची इच्छा होती. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी २०२१मध्ये गारमेंट क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात खेळत्या भांडवलाचे नियोजन करणे, बाजारात विश्वासार्हता निर्माण करणे आणि मोठ्या ऑर्डर मिळवणे ही आव्हाने होती. पती कुशल यांचे आर्थिक धोरणात मिळालेले मार्गदर्शन, सासरे नवरतन चोपडा यांचा पाठिंबा आणि दीर विजय चोपडा यांची उत्पादनातील मोलाची साथ यामुळे त्यांनी या आव्हानांवर मात केली.

स्थानिक महिलांना केवळ रोजगारच नाही तर त्यांना शिवणकाम आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवण्याचे काम पायल चोपडा करत आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ (एमएसएसआयडीसी) यांच्या सहकार्याने महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमही राबवले जातात. त्या अंतर्गत चोपडा यांना स्वत:चा उद्योग उभा करण्यात बरीच मदत झाली.

स्वतःवर विश्वास ठेवा, पहिले पाऊल उचला आणि मोठी स्वप्ने पाहण्यास घाबरू नका. धैर्य, योग्य पाठिंबा असेल तर कोणतीही महिला आपल्या स्वप्नांचे रूपांतर उद्योगात करू शकते, असा सल्ला चोपडा नवउद्योजिकांना देतात. येत्या तीन ते पाच वर्षांत देशातील अव्वल दहा युनिफॉर्म उत्पादकांमध्ये स्थान मिळवण्याचा त्यांचा मानस आहे. याशिवाय, मुंबई शेअर बाजाराच्या बीएसई, एसएमई प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत पायल कंपनी बनण्याचे लक्ष्य त्यांनी ठरविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *