माहूरच्या रेणुका मातेचं दर्शन घेऊन परतताना अनर्थ; भाविकांचा टेम्पो 100 फूट खोल दरीत कोसळला, तिघांचा करुण अंत

माहूरच्या रेणुका मातेचे दर्शन घेऊन यवतमाळकडे परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो सुमारे शंभर फूट खोल दरीत कोसळून तीन भाविकांचा जागीच मृत्यू तर चालकासह तिघे गंभीर जखमी झाले. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास माहूर घाटात हा भीषण अपघात घडला.

यवतमाळ येथील फर्निचरच्या दुकानातील सहा कामगार प्रतीक अडकिने ( वय२६), दत्ता मेश्राम (वय ३५), यशवंत पाटील ( वय २५), बाबाराव टेकाम (वय ६०), राहुल ठाकरे (वय २५), प्रीतम प्रधान (वय ३८) एमएच २९ बीई ६८५९ क्रमांकाच्या टेम्पोने गुरुवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास माहूरकडे दर्शनासाठी निघाले. रात्री बाराच्या सुमारास माहूरला पोहचून त्यांनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्यांनी यवतमाळकडे परतीचा प्रवास सुरू केला. मात्र, घरी पोहचण्याआधीच रेणुका मातेच्या या भक्तांवर काळाने झडप घातली.

रात्री दर्शन घेऊन पहाटे घरी येण्यास निघाले

यवतमाळमधील एका फर्निचरच्या दुकानात काम करणारे सहा कामगार गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास टेम्पोने श्री रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी माहूर गडावर गेले होते. मध्यरात्री १२च्या सुमारास देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास ते परतीच्या प्रवासाला निघाले. घाटातील नागमोडी वळणावर हा अपघात झाला.

कठडे नसल्याने वाहन थेट दरीत

समोरुन येणारे वाहन चुकीच्या दिशेने येत होतं. त्या वाहनाच्या हेडलाईटचा तीव्र प्रकाश टेम्पो चालकाच्या डोळ्यांवर पडल्यानं चालकानं धडक टाळण्यासाठी गाडी मोकळ्या जागेकडे वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र वळणावर मजबूत संरक्षक भिंत नसल्याने टेम्पोचा तोल गेला अन् थेट १०० फूट खोल दरीत कोसळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *