अकोल्यात २० वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती; बसणार पाणीटंचाईच्या तीव्र झळा

यंदा पावसाने दडी मारल्याने अकोला जिल्ह्यातील मोठ्या धरणांसह लघु सिंचन तलावांची स्थिती चिंताजनक बनली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात सध्या केवळ १६.८७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. परिणामी २००५नंतर; २० वर्षांनी अकोल्याला तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भीषण पाणीटंचाईचा अनुभव

मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांप्रमाणे अकोला जिल्ह्यातही दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अकोला महानगरपालिकेने शहरात दहा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. सुमारे दोन दशकांपूर्वी अल्प पावसामुळे अकोल्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

उपलब्ध पाणीसाठा

जिल्ह्यातील जलसाठ्याची स्थिती लक्षात घेता महान-काटेपूर्णा प्रकल्पात १४.५६९ दशलक्ष घनमीटर, म्हणजे १६.८७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. तेल्हारा तालुक्यातील वाण प्रकल्पात ७५.६२ दशलक्ष घनमीटर, म्हणजे ९२.२७ टक्के, तर पातूर तालुक्यातील मोर्णा प्रकल्पात २६.११ दशलक्ष घनमीटर, म्हणजे ६२.९८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. निर्गुणा प्रकल्पात १५.४१ दशलक्ष घनमीटर (५३.४१ टक्के), तर मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्पात केवळ ०.४८७ दशलक्ष घनमीटर (४.१७ टक्के) जलसाठा आहे.

काटेपूर्णा प्रकल्पातील घट

बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा प्रकल्पात ४.८९ दशलक्ष घनमीटर (४७.९८ टक्के), तर अकोट तालुक्यातील पोपटखेड प्रकल्पात १७.४७ दशलक्ष घनमीटर (९६.९७ टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. लघु सिंचन प्रकल्पांमध्येही स्थिती चिंताजनक आहे. महान परिसरातील झोडगा लघु सिंचन प्रकल्पात ०.२४९५ दशलक्ष घनमीटर (१५.५० टक्के), तर हातोला लघु सिंचन प्रकल्पात ०.१९८३ दशलक्ष घनमीटर (९.८६ टक्के) जलसाठा शिल्लक आहे. वाण आणि पोपटखेड प्रकल्पांमध्ये जलसाठा समाधानकारक दिसत असला, तरी अकोला शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या काटेपूर्णा प्रकल्पातील घट गंभीर आहे.

तर मृत साठ्यातून उपसा

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाला तर काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो;अन्यथा पुढील काही महिन्यांत कोटपूर्णा धरणातील मृत जलसाठा उपसा करण्याची वेळ अकोला महानगरपालिका आणि जलसंपदा विभागावर येणार असल्याचे अधिकारी सांगतात.सध्या कोटपूर्ण धरणातील उपलब्ध जलसाठा अकोला शहारासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे.

पाणी बचत हवीच

राज्यात दुष्काळी ढग असल्याने पाणीटंचाईच्या झळा बसणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.राज्य सरकारने दहा टक्के पाणीकपातीची घोषणा केली.नागपूर महापालिकेने तूर्त दहा टक्के पाणी कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. कपात करण्याऐवजी महापालिकेचा गळती रोखणे, अनाधिकृत जोडण्या नियमित करणे आणि नागरिकांना पाणी बचतीचे सतत आवाहन करणे यांसारख्या उपायांवर तसेच उपक्रमांवर भर राहणार आहे.

पण,शहराला होणाऱ्या ७४० एमएलडी पाण्यापैकी २५९ एमएलडी पाण्याची विविध कारणांनी नासाडी होते.याकडे महापालिकेला अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. कारण ‘अल निनो’चा प्रभाव आणखी काही महिने राहणार असल्याने आत्तापासून पाणीबचतीची सवय नागरिकांना लावणे अधिक उपयोगी ठरेल.-नेहा रोकडे,नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *