मुंबईकरांनो हॉटेलची थाळी महागणार! खाद्यपदार्थांच्या किंमती १० ते १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

भाजीपाला, धान्य आणि कडधान्यांच्या कडाडलेल्या किमतींचा फटका आता थेट मुंबईकरांच्या जिभेला आणि खिशाला बसणार आहे. वाढत्या व्यावसायिक खर्चामुळे मुंबईतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधील खाद्यपदार्थांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता ‘ इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ’कडून (आहार) वर्तवण्यात आली आहे. या संभाव्य दरवाढीच्या चर्चेमुळे मुंबईकरांच्या खिशावरील भार चांगलाच वाढण्याची चिन्हे आहेत.

हॉटेल चालवणे परवडत नाही

गेल्या काही महिन्यांत किरकोळ बाजारात मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत. विशेषतः हॉटेल व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल, जसे की डाळी, तेल, मसाले आणि रोजचा भाजीपाला यांचे दर गगनाला भिडले आहेत. भाजीपाल्याचे दर कडाडल्याने हॉटेल चालवणे परवडत नाही. यामुळे हॉटेलचा व्यवस्थापन खर्च वाढला असून, दरवाढीशिवाय पर्याय नाही, असे असोसिएशनचे मत आहे.

नियमित ग्राहकांचाही विचार!

असोसिएशन जरी १० ते १५ टक्के वाढ सुचवली असली,तरी आम्ही अचानक एवढी मोठी वाढ करू शकत नाही.आमच्याकडे रोज .येणारे अनेक विद्यार्थी आणि नोकरदार आहेत.ग्राहकांचे नुकसान होऊ नये आणि आमचा व्यवसायही टिकावा,असा सुवर्णमध्य साधून आम्ही केवळ ५ ते ८ टक्केच वाढ करण्याचा विचार करत आहोत,असे अनेक हॉटेल चालकांचे म्हणणे आहे.

बजेट कोलमडणार !

नोकरी ,शिक्षण किंवा कामानिमित्त कुटुंबापासून दूर राहून रोज हॉटेलच्या जेवणावर अवलंबून असणारे नोकरदार आणि विद्यार्थी यांना या महागाईचा सर्वाधिक फटका सोसावा लागणार आहे.रोजच्या चहा-नाशत्यापासून ते दुपारच्या आणि रात्रीच्या थाळीपर्यंत सगळंच महागणार असल्याने त्यांचे मासिक बजेट पूर्ण कोलमडणार आहे. एवढेच नव्हे,तर वीकेंडला सहकुटुंब बाहेर जेवणाचा आनंद घेणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबाचेही आर्थिक नियोजन आता बिघडण्याची निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *