अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा समुद्रकिनारी गोणीत बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीच्या मृतदेहाचं गूढ अखेर उलगडलं आहे. १ ऑक्टोबर रोजी देवाची वाडी, जे. पी. रोड येथील हिंदू स्मशानभूमीच्या मागील बाजूस हा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृत व्यक्ती संतोष मिश्रा याच्याकडे काम करत होता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती मालाड पश्चिम येथील भाजी विक्रेता संतोष मिश्रा याच्याकडे काम करत असल्याचं समोर आलं आहे. मात्र, घटना उघडकीस आल्यानंतर संतोष मिश्रा याच्यासह त्याच्याकडे काम करणारे इतर कामगारही गायब असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे तपासाची दिशा अधिक स्पष्ट झाली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, जुन्या वादातून मृत व्यक्तीच्या डोक्यावर गंभीर दुखापत करून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह गोणीत बांधून समुद्रात फेकण्यात आल्याचा संशय आहे. हत्येनंतर आरोपी वेगवेगळ्या राज्यात पसार झाल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
गुन्हे शाखा आणि वर्सोवा पोलिसांचा संयुक्त तपास
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिटने आणि वर्सोवा पोलिसांनी या प्रकरणाचा संयुक्त तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींचा माग काढत उत्तर प्रदेशातून जुगाराज यादव याला ७ ऑक्टोबर रोजी अटक केली. यानंतर १३ ऑक्टोबर रोजी संतोष मिश्रा याच्यासह अन्य आरोपींचा शोध घेऊन त्यांना वर्सोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. या प्रकरणात आतापर्यंत एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. हत्येमागील नेमकं कारण, तसेच प्रत्येक आरोपीची भूमिका काय होती? याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
रसायन सांडून कामगाराचा मृत्यू
कंटेनरमधून घातक रसायनाचे नमुने काढताना अंगावर रसायन सांडल्याने गंभीर भाजलेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना पनवेलमधील लिटमस ऑर्गेनिक्स प्रा. लि. कंपनीशी संबंधित कामादरम्यान घडली. धोकादायक रासायनिक पदार्थ हाताळताना कामगाराच्या सुरक्षेसाठी आवश्यक साधने आणि उपाययोजना न केल्याचा आरोप असून, पनवेल तालुका पोलिसांनी कंपनीतील दोन अधिकाऱ्यांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
भागवत गर्कळ (५१) असे मृत कामगाराचे नाव आहे. ३० जुलै रोजी सायंकाळी ४च्या सुमारास कसळखंड येथील आष्टी सीएफएस परिसरात रिजेक्टेड कंटेनरमधील ‘सॅच्युरेटेड अॅसायक्लिक मोनोकार्बोक्झिलिक अॅसिड’ या घातक रासायनिक पदार्थाचे नमुने काढण्याचे काम सुरू होते. यावेळी लिटमस ऑर्गेनिक्स प्रा. लि. कंपनीतील कमर्शिअल ऑफिसर प्रणय रहाटे आणि कस्टम हाउस एजंट रवींद्र नन्हे यांनी गर्कळ यांना नमुने काढण्यास सांगितल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
