नालासोपाऱ्यात बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; पाच जणांवर गुन्हे दाखल, उपचार घेण्यापूर्वी सावध राहा!

 वसई-विरार शहर महापालिका कार्यक्षेत्रात नागरिकांच्या आरोग्याशी आणि जिवाशी खेळणाऱ्या अवैध वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध महापालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या विशेष पथकांनी विविध भागांत एकाच वेळी छापे टाकून सात बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

महापालिका कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बोगस डॉक्टरांनी बस्तान मांडल्याच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर, महापौर, आयुक्त आणि आरोग्य समिती सभापती यांच्या निर्देशांनुसार, महापालिका कार्यक्षेत्रात ही कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण पाच विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी विविध संशयास्पद दवाखान्यांवर छापे टाकले. या मोहिमेत पहिली मोठी कारवाई नालासोपारा पूर्वेकडील संतोषभुवन परिसरात करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पांढरे यांच्या नेतृत्वाखालील पथकात डॉ. विक्रम राठोड, डॉ. कृपाली फर्डे, डॉ. रिद्धी पाटील, डॉ. तृप्ती कोकाटे आदींचा समावेश होता.

या पथकाने संतोषभुवन परिसरात एकूण पाच अवैध वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई केली. हे संशयित आरोपी कोणतीही कायदेशीर वैद्यकीय पात्रता किंवा पदवी नसताना नागरिकांची तपासणी करत होते आणि स्वतःकडील ॲलोपॅथीची औषधे व इंजेक्शन्स रुग्णांना देताना आढळले. या कारवाईत संतोषभुवन भागातील बाळशेतपाडा येथील ‘लसावीर हेल्थ केअर सेंटर’चे सुकांता नायक (५६) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायक हे बीईएमएस पदवीची बतावणी करून विनापरवाना वैद्यकीय सेवा देत होते. तसेच, श्रमिक नगर येथील मेडीक्योअर पॅथॉलॉजीचे राकेश उपाध्याय उर्फ वेदजी उपाध्याय (४५), ओम साई हेल्थ केअर क्लीनिकचे अनिल यादव (५१) आणि भक्ती धाम येथील जीवदानी हेल्थ केअर सेंटरचे दिनानाथ यादव (५२) हे डीईएचएम पदवी सांगून अवैध ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. याच परिसरातील वैष्णवी हेल्थ केअर सेंटरचे प्रदीप कुमार पटेल (४५) यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *