पुण्यात नवी नोकरी, 22 वर्षीय IT इंजिनिअरचं टोकाचं पाऊल, लॅपटॉपमध्ये चॅटिंग-स्क्रीनशॉट्स सापडले, दोघांवर गुन्हा

हरियाणातील पोलिस अधिकारी असल्याचे सांगून अंमली पदार्थ विक्रीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची आणि अटकेची धमकी देऊन पैशांसाठी दबाव टाकल्याने मानसिक तणावाखाली येऊन खराडीतील २२ वर्षीय संगणक अभियंत्याने इमारतीवरून उडी मारून आयुष्याची अखेर केली. शिखर कुमारगौरव सक्सेना असे मृताचे नाव असून, त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून अजयकुमार भाटिया व एका अज्ञाताविरुद्ध जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

पुण्यात नव्याने नोकरीला

शिखर हा मूळचा उत्तराखंडमधील हरिद्वारचा रहिवासी होता. हिमाचल प्रदेशातून बी.टेक.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला पुण्यातील मगरपट्टा येथील नामांकित कंपनीत नोकरी मिळाली. २३ जुलैला तो पुण्यात आला. तो एक सप्टेंबरपासून खराडीतील एका पीजीमध्ये राहत होता.

शिखरच्या आईला ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी एका अनोळखी मोबाइलवरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने शिखरची चौकशी केली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी संबंधित क्रमांक तपासला असता ‘ट्रु-कॉलर’वर अजयकुमार भाटिया असे नाव दिसले. त्यांनी त्या व्यक्तीशी संपर्क साधला. त्या वेळी संबंधिताने आपण शिखरचा मित्र असल्याचे सांगितले. मात्र, शिखरशी संपर्क होत नसल्याने वडिलांनी पुन्हा फोन केला. त्या वेळी त्याने आपण हरियाणातील गुरुग्राम येथील सेक्टर २९ मध्ये सब-इन्स्पेक्टर असल्याचा दावा केला.

अपहरणाची तक्रार

शिखरचा मोबाइल बंद असल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, त्याच्याशी संपर्क होत नसल्याने आणि त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने त्याच्या मामाने खराडी पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली होती. त्यानंतर शिखरने जीव दिल्याचे समोर आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *