पुण्यात 24 वर्षीय तरुणाने मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवत रस्त्यावर धिंगाणा घातला. दारुच्या नशेत कार चालवताना त्याने तीन ते चार दुचाकींना धडक दिली. रात्री आठच्या सुमारास कोथरूडमधील एमआयटी महाविद्यालयासमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला. या अपघातात तीन ते चार दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कारचालकाला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. कोथरूड पोलिसांनी २४ वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून, त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
एमआयटी महाविद्यालयाच्या दिशेने पौड रस्त्यावरून कोथरूड डेपोकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने तीन ते चार दुचाकींना धडक दिली. या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. अपघातानंतर नागरिकांनी कार अडवून चालकाला बाहेर काढले. त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
नांदेडमध्ये भाविकांच्या टेम्पोला अपघात, तीन जण ठार
भाविकांचा छोटा टेम्पो दरीत कोसळून 3 जण ठार तर चार जण जखमी झाले. तिर्थक्षेत्र असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूरमध्ये हा अपघात घडला. आज पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात घडला. यवतमाळ येथील सहा भाविक माहूरला रेणुका मातेच्या दर्शनासाठी आले होते. परत जाताना केरोळी घाटात धोकादायक वळणावर त्याचा टेम्पो दरीत कोसळला. टेम्पो दरीत कोसळल्यानंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एका भाविकाचा उपचारा दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जखमीना दरीतून बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले
