अलिबागमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला असून फिरायला आलेल्या 25 वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. या तरुणाच्या मृत्यूनंतर एका महिला डॉक्टरने घेतलेल्या निर्णयामुळे सदर प्रकरणाचं गूढ अधिकच वाढलं आहे. विशेष म्हणजे मयत तरुण हा त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत लॉजवर मुक्कामी थांबलेला असतानाच त्याचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबागमध्ये पर्यटनासाठी अलिबागमध्ये आलेल्या या 25 वर्षीय तरुणाचा वरसोली येथील एका लॉजवर संशयास्पद मृत्यू झाला. हा सारा प्रकार बुधवारी, 14 ऑक्टोबर रोजी घडला. या प्रकारानंतर, कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करताच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच या प्रकरणामध्ये जिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
कुठून आलेला हा तरुण?
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथील 25 वर्षीय तरुण त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत वरसोली समुद्रकिनारी फिरण्यासाठी आला होता. त्यांनी वरसोली येथील ‘लोटस लॉज’वर रूम बुक केली होती. यादरम्यान अचानक या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर, सोबत असलेल्या तरुणीने आणि नातेवाईकांनी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला.
महिला डॉक्टरने तो निर्णय का घेतला?
ज्यावेळी या तरुणाचा मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला तेव्हा जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात डॉ. भैरवी मालवणकर ड्युटीवर होत्या. नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्याची इच्छा नसल्याचे सांगितल्यामुळे, डॉक्टरने कोणतेही लेखी पत्र न घेता आणि जिल्हा शल्यचिकित्सकांची परवानगी न घेताच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सामान्यपणे अशा प्रकरणांमध्ये रितसर पद्धत आणि कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतरच मृतदेह ताब्यात दिला जातो. इथे मात्र महिला डॉक्टरांनी या प्रक्रियेला बगल दिली.
पोलिस येण्यापूर्वीच…
तरुणाचा मृत्यू संशयास्पद असताना रुग्णालयात आणल्यानंतर शवविच्छेदन करणे बंधनकारक होते. डॉ. मालवणकर यांनी पोलिसांना फोन केला होता, परंतु ते पोहोचण्यापूर्वीच नातेवाईक मृतदेह घेऊन निघून गेले. मृतदेह परस्पर नेल्यामुळे तरुणाच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे. रुग्णालयाने संपर्क साधल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह पुन्हा रुग्णालयात आणला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या सुपूर्द केला. शवविच्छेदनानंतर ‘व्हिसेरा’ सुरक्षित ठेवण्यात आला असून तो तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवला जाणार आहे.
