शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनं ठाण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली. या हत्या प्रकरणात राजकीय वैमनस्य असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबाने केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू असून दररोज नवीन माहिती समोर येत आहे. प्रदीप पूर्णेकरांच्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. या प्रकरणातील आरोपी पप्या शिंदेच्या बुटामुळे प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
बूट घालण्यामागेही आरोपीचा कट?
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशी एकामागून एक धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर येत आहे. तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, हत्येच्या दिवशी नेहमी चप्पल घालून येणारा मुख्य संशयित सुभाष उर्फ पप्या शिंदे चक्क बूट घालून ऑफिसमध्ये आला होता. पप्याने बूट न काढता थेट पुर्णेकरांच्या केबिनमध्ये प्रवेश केल्याची धक्कादायक माहिती काल गुरुवारी पोलीस तपासातून उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, पूर्णेकर यांच्या ऑफिसचा दरवाजा सतत उघडा राहावा आणि तो बंद होऊ नये, यासाठीच त्याने एक पाय बाहेरच्या बाजूला ठेवला होता.
