इस्लाम धर्म आणि प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या हिंदू तरुणाची फाशीची शिक्षा सौदी अरेबियामधील सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे. हा तरुण श्रीलंकेतील हिंदू स्थलांतरित कामगार आहे. अनोझन शिवरासा याने फेसबुकवर ही टिप्पणी केली होती, ज्यानंतर त्याला फाशाची शिक्षा सुनावली होती. कोलंबोने केलेल्या सातत्यपूर्ण राजनैतिक आणि कायदेशीर प्रयत्नांनंतर ही शिक्षा रद्द झाली आहे. श्रीलंकेच्या परराष्ट्र व्यवहार, परदेशातील रोजगार आणि पर्यटन मंत्रालयाने बुधवारी (14ऑक्टोबर) जारी केलेल्या निवेदनात या घडामोडीला दुजोरा दिला. सौदी अरेबियाच्या सर्वोच्च न्यायालयाने 13 ऑक्टोबर रोजी ही फाशीची शिक्षा रद्द केल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
