राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे. आजही मुंबईसह राज्यात उन्हाचा ताप आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. मात्र राज्यातील काही भागात विजांसह पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळं राज्यातील विविध भागांत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. राज्यातून तर पावसाने माघार घेतली आहे. पावसाने माघार घेताच राज्यातील अनेक भागात उकाड्यात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पारा सातत्याने 36 अंशांच्या वर आहे. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढून दमट हवामानाची शक्यता आहे. तर एकीकडे राज्यात विजांसह पावसाला पोषक हवामान तयार होत असून पुढील चार-पाच दिवस विविध भागांत वादळी पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सोलापूर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली आणि धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अल निनोमुळे यंदा परतीचा पाऊसच तर सोडाच पण ऑक्टोबर हिटचा तडाखा देखील नेहमीपेक्षा जास्त असू शकतो, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. दरम्यान, येत्या तीन चार दिवसात दक्षिण महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता असली तरी तो पाऊस रब्बी हंगामासाठी समाधानकारक असेलच असंही नाही, असंही निरिक्षण हवामान खात्याने नोंदवलंय.
मुंबईत पारा चढाच
मुंबईचा पारा उतरत नसल्याचे चित्र आहे. बुधवारी कुलाबा येथे 36.4 तर सांताक्रूझ येथे 37.8 अंश सेल्सियस म्हणजेच सरासरीपेक्षा 4.1 अंशांहून अधिक तापमान नोंदवले गेले. भारतीय हवामान विभागाने 14 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण राज्यात उकाडा कमालीचा वाढला असून अनेक शहरांमध्ये तापमान सरासरीपेक्षा खूप आस्त नोंदवले गेले. यवतमाळ येथे राज्यातील सर्वात जास्त 38.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कोकणातील रत्नागिरीमध्ये तर कमाल तापमान 38.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा 5.7अंशांनी जास्त आहे.
