दिल्ली पोलिसांनी आज पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मदतीने अंकिता भंडारीच्या पालकांसहीत काँग्रेसच्या नेत्यांना इंडिया गेटवरुन ताब्यात घेतलं. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेस खासदार पवन खेरा, इम्रान प्रतापगढ़ी, जोथिमणी, आर सुधा आणि सुप्रिया श्रीनाटे, उदय भानू चिब, विनोद जाखड़, वरुण चौधरी यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे. या सर्वांना जबरदस्तीने बसमध्ये बसवून घेऊन जाण्यात आलं. अंकिताचे पालक दुष्यंत कुमार गौतम यांच्या नियुक्तीचा विरोेध करत आहेत. अंकिताच्या हत्या प्रकरणामध्ये दुष्यंत कुमार गौतम यांचा हात असल्याचा अंकिताच्या पालकांचा आरोप असून असं असतानाही त्यांना सिक्कीमचे राज्यपालपदी बसवण्यात येणार असल्याचा विरोध अंकिताचे पालक करत आहेत.
सप्टेंबर 2022 मधील एका प्रकरणात तर दुष्यंत कुमार गौतम यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने त्याच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. दुष्यंत गौतम यांचे नाव अद्याप अंकिता भंडारी प्रकरणातील कोणत्याही आरोपपत्रात आलेले नाही. मात्र या प्रकरणात अलीकडेच ज्या ‘व्हीआयपी’चा (VIP) उल्लेख करण्यात आलेली व्यक्ती गौतमच असल्याचा अंकिता भंडारीच्या पालकांचा आरोप आहे. त्यामुळेच ते आता दुष्यंत यांच्याविरुद्ध आंदोलन करत असतानाच त्यांनी रात्री पावणे चारवाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं.
अत्यंत लज्जास्पद आणि अमानवीय
“अंकिता भंडारीसाठी न्यायाची मागणी करत इंडिया गेटवर शांततेने आंदोलन करणाऱ्या तिच्या आई-वडिलांना पहाटे साडेचार वाजता पोलिसांनी ताब्यात घेणे, ही अत्यंत लज्जास्पद आणि अमानवीय कृती आहे,” असं म्हणत काँग्रेच्या विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष विनोद झाकर यांनी संताप व्यक्त केला आहे. “ज्या देशात न्यायाची मागणी करणाऱ्या पीडितेच्या कुटुंबाचे मध्यरात्री अपहरण केले जाते, तिथे सरकारच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. भाजप सरकारची भूमिका स्पष्ट आहे—न्यायाची मागणी करणाऱ्या पीडितेच्या कुटुंबासोबत उभे राहण्याऐवजी, व्हीआयपींच्या संरक्षणासाठी राजकारण खेळले जात आहे,” अशी टीका वनोद यांनी केली आहे.
राहुल गांधींनी घेतली भेट
काल रात्री विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधींनी इंडिया गेटला जाऊन अंकिताच्या आई-वडिलांची भेट घेतली होती. “अंकिताला न्याय मिळेल आणि तिच्या आई-वडिलांनाही न्याय मिळेल. हा लढा कितीही काळ चालला तरी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी उभे आहेत,” या कॅप्शनसहीत काँग्रेसने राहुल गांधींच्या भेटीचा व्हिडीओ पोस्ट केला.
नेमकं प्रकरण काय?
अंकिता भंडारी प्रकरण ऋषिकेशमधील एका रिसॉर्टवर रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या 19 वर्षीय अंकिताच्या हत्येशी संबंधित आहे. रिसॉर्ट चालवणारे पुलकित आर्य हे भाजपच्या एका माजी नेत्याचे पुत्र आहेत. अंकिताने रिसॉर्टमधील पाहुण्यांच्या लैंगिक मागण्या फेटाळल्यामुळे तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. 18 सप्टेंबर 2022 रोजी अंकिता अचानक रिसॉर्टमधून गायब झाली. 24 सप्टेंबर 2022 रोजी ऋषिकेश येथील चिल्ला कालव्यात अंकिताचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू पाण्यात बुडल्यामुळे आणि शरीरावर जखमा असल्यामुळे झाल्याचे समोर आले. स्थानिक न्यायालयाने या प्रकरणात तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र, जानेवारी 2026 मध्ये एका अज्ञात ‘व्हीआयपी’चा (VIP) उल्लेख असलेल्या आरोपांमुळे आणि त्यासंदर्भातील व्हायरल ऑडिओ व व्हिडिओ क्लिप्सने लक्ष वेधून घेतले. य़ा ‘व्हीआयपी’ विरुद्ध एफआयआर (FIR) दाखल झाला होता.
या प्रकरणात दुष्यंत कुमार गौतम यांच्या कथित सहभागाच्या आरोपावरुन आंदोलन करताना आता नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर पुढे काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
