‘टार्गेट’ भलतंच अन् बळी गेला निष्पापाचा! 20 लाखांची सुपारी फसली, शिरुरमधील थराराचं गुपित उघड; पुण्यात नेमकं काय घडलं?

शिरूर तालुक्यातील कारेगावमध्ये घडलेल्या एका गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. पाणी प्लँटमध्ये काम करणाऱ्या एका निष्पाप कामगारावर गोळी झाडून त्याची हत्या करण्यात आली खरी, पण पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा छडा लावला तेव्हा समोर आलेलं सत्य ऐकून सगळेच थक्क झाले. मारायचं होतं मालकाला, पण मारेकऱ्यांनी मालक समजून बिचाऱ्या कामगाराचाच गेम केला! स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश करत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

जमिनीचा वाद अन् थेट हत्येची सुपारी

या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे स्टोन क्रशर, सामायिक रस्त्याचा वावर आणि एका जमिनीच्या वादात अडकलेली आहेत. कारेगावचा राहणारा २४ वर्षांचा सार्थक कोहकडे आणि विकास नवले यांच्यात जागेवरून जोरदार वाद सुरू होता. हा वाद इतका टोकाला गेला की कोहकडेने नवले यांचा काटा काढायचं ठरवलं. यासाठी त्याने तुषार तोडकर (वय २८, रा. पेठ, आंबेगाव) याला हत्येची सुपारी दिली. तुषारने ही सुपारी पिंपरी-चिंचवडचा सराईत तडीपार गुन्हेगार संतोष मांजरे (वय ३७, रा. खेड) याला दिली.

नवले समजून झाडली हमजा यांच्यावर गोळी

सुपारी हातात आल्यावरसंतोष मांजरेने आपल्या साथीदारांना गोळा करून प्लॅन आखला. यामध्ये विठ्ठल पिकळे (वय २७), योगेश इडोळे (वय २८), पवन हुंडारे आणि पृथ्वी ऊर्फ भैय्या जाधव यांचा समावेश होता. हे मारेकरी नवले यांचा गेम करण्यासाठी कारेगाव येथे पोहचले. तिथे हमजा उस्मान शेख (वय ३९) हे काम करत होते. मारेकऱ्यांनी हमजा यांनाच विकास नवले समजलं आणि क्षणाचाही विचार न करता थेट त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. गंभीर जखमी झालेल्या हमजा यांचा जागीच जीव गेला. मूळच्या परभणीच्या असलेल्या हमजा यांच्या पत्नी अबिताबी शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासामुळे फुटले बिंग

भरदिवसा झालेल्या या हत्येमुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं होतं. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि रांजणगावचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकं तयार करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण करत पोलिसांनी धागेदोरे जोडले आणि संशयितांची कुंडलीच बाहेर काढली.

पोलिसांनी सापळा रचून सार्थक कोहकडे, तुषार तोडकर, संतोष मांजरे, विठ्ठल पिकळे आणि योगेश इडोळे या पाच जणांना ताब्यात घेतलं. खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, अनिल मोरडे, उपनिरीक्षक महेश डांगरे, तिडके, थोरात यांच्यासह पोलिस अंमलदारांच्या पथकाने महत्त्वाची कामगिरी बजावली.

दोघे अजूनही रडारवर

या हत्याकांडातील साथीदार पवन हुंडारे आणि पृथ्वी जाधव हे दोघे सध्या फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. मालकाच्या वादात निष्पाप कामगाराचा हकनाक बळी गेल्याने कारेगाव परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, पोलिस निरीक्षक कुमार कदम या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *