चमचमीत आणि कुरकुरीत चिकनसाठी प्रसिद्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय ब्रँड ‘केएफसी’च्या किचनमध्ये थेट ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. शहरातील बीड बायपास, शाहनूरवाडी येथील ‘सफायर फूड्स इंडिया लिमिटेड’ संचलित केएफसी उपाहारगृहात अस्वच्छतेचा कळस आणि अन्न सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे एफडीएच्या अचानक केलेल्या धाडीत स्पष्ट झाले. या गंभीर उल्लंघनामुळे अन्न व औषध प्रशासनाने या केएफसी आउटलेटचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करून उपाहारगृह पूर्णपणे बंद करण्याचे कठोर आदेश दिले आहेत.
अन्न सुरक्षा अधिकारी पी. पी. सुरसे यांनी छत्रपती संभाजीनगरमधील केएफसी आउटलेटची अचानक तपासणी केली असता तेथील भीषण वास्तव समोर आले. उपाहारगृहात कच्चे व शिजवलेले अन्न तसेच शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ एकमेकांत मिसळतील अशा अत्यंत निष्काळजी पद्धतीने ठेवण्यात आले होते. याशिवाय, अन्न शिजवताना व साठवताना गरम आणि थंड अन्नाचे तापमान नियंत्रणात ठेवण्याबाबत कमालीची हलगर्जी केली जात असल्याचे आढळले. यामुळे अन्नात विषबाधा होण्याचा किंवा जिवाणू संसर्ग होण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता.
