अवघ्या सहा तासात ठाणे पोलिसांनी २४ वर्षाचा विरह संपवला;लेकीला सापडले तिचे घर,कुटुंबासाठी अत्यंत भावनिक क्षण

बालपणात एक मुलगी हरवते. खेळण्या-बागडण्याच्या वयातच कुटुंबापासून दुरावलेल्या या मुलीवर बालगृहात राहण्याची वेळ येते. आयुष्य पुढे सरकत राहते. मोठी झाल्यानंतर तिचे लग्नही होते. पण, जन्मदात्या कुटुंबाला भेटण्याची तिची ओढ कधीच मावळत नाही. गेली आठ वर्षे कुटुंबाचा शोध घेणारी ही महिला ठाणे पोलिसांच्या संपर्कात आली आणि अवघ्या सहा तासांत २४ वर्षांपूर्वी कुटुंबापासून दुरावलेल्या या महिलेला तिच्या कुटुंबाचा शोध लागला. मतदारयादी आणि महिलेच्या हातावरील गोंदण यावरून पोलिसांनी तिच्या कुटुंबाचा माग काढला.

माणसांना भेटण्याची ओढ कायम

सन २००२मध्ये ही मुलगी नवी मुंबईतील मामाच्या घरी गेली असता हरवली. बेलापूर पोलिसांना ही मुलगी मिळाल्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबाचा शोध घेतला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यामुळे पोलिसांनी तिला बालगृहात ठेवले. मोठी झाल्यावर तिचा विवाह झाला. नंतर ती सोलापूरला राहू लागली. तिला दोन मुले झाली. काळ पुढे सरकत असताना रक्ताच्या नात्यातील माणसांना भेटण्याची ओढ मात्र कायम होती.

गेल्या आठ वर्षांपासून ती आई-वडील आणि भावंडांचा शोध घेत होती. तर, तिच्या भावंडांकडूनही हरवलेल्या बहिणीचा शोध घेण्याचे प्रयत्न थांबलेले नव्हते.

घटना खूप जुनी ,कुटुंबाचा शोध घेणे आव्हान

अखेर ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता या महिलेने ठाणे पोलिसांच्या बाल संरक्षण कक्षाशी संपर्क साधत कुटुंबाचा शोध घेण्याची विनंती केली. बाल संरक्षण पथकाने तत्काळ तपासाला सुरुवात केली. जुन्या पोलिस अभिलेखांची तपासणी केली. नवी मुंबई पोलिसांशी संपर्क साधत काही नोंदींची पडताळणी केली. ही घटना खूप जुनी असल्याने उपलब्ध माहितीच्या आधारे महिलेच्या कुटुंबाचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.

महिलेच्या कुटुंबाचा शोध लागला

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय मतदारयाद्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. २००२मधील मतदारयाद्यांमध्ये शोध घेत असताना हरवलेल्या मुलीच्या भावाच्या नावाशी संबंधित नोंद आढळली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित भागातील बीएलओ यांच्याशी संपर्क साधला. महिलेच्या हातावर तिचे नाव गोंदण्यात आले होते. हा संदर्भ, तसेच विविध नोंदी आणि अन्य तपशीलांची पडताळणी करत पथकाला महिलेच्या कुटुंबाचा शोध लागला.

कुटुंबासाठी अत्यंत भावनिक क्षण

या महिलेचे भाऊ आणि बहीण यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या महिलेला तिच्या भावंडांशी जोडले. भावंडांनी तिला पाहिल्यानंतर तिची ओळख पटवली. तब्बल २४ वर्षांनंतर हरवलेल्या बहिणीशी पुन्हा संपर्क झाल्याचा हा क्षण त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय ठरल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांचे अथक परिश्रम

अवघ्या सहा तासांच्या आत या महिलेच्या तिच्या भावंडांशी पुन्हा संपर्क घडवून आणण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी ठाणे पोलिसांनी केली आहे.यामध्ये प्रामुख्याने बाल संरक्षण कक्षातील पोलिस हवालदार उपनिरीक्षक वासंती शिंदे, पोलिस हवालदार तानाजी गायकवाड,पोलिस नाईक तेजश्री शिरसाठ आणि पोलिस शिपाई सुवर्णा यांदव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *