थंडी विसरा, आता घामाच्या धारा लागणार, मुंबईत तापमानाचा कहर, शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट; हवामान विभागाचा नवा अंदाज

गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्याचा रविवारी मुंबईमध्ये कहर होऊन शहराचे कमाल तापमान ३८ अंशांवर पोहोचले. गेल्या दहा वर्षांतील हे मुंबईतील ऑक्टोबरमधील विक्रमी तापमान आहे.

मुंबईमध्ये कमाल तापमानाचा पारा वाढला

मुंबईमध्ये कमाल तापमानाचा पारा सांताक्रूझ येथे रविवारी सरासरीपेक्षा ४.९ अंशांनी अधिक नोंदला गेला. या आधी सन २०१८मध्येही ऑक्टोबर महिन्यात ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. तर रविवारी कुलाबा येथे कमाल तापमान सरासरीहून ३.९ अंशांनी अधिक होते. कुलाबा येथे ३६.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाब्याचे तापमान गेल्या दहा वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाचे विक्रमी तापमान होते. कुलाबा केंद्रावर या आधी सन २०१८मध्येच ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती.

वातावरण अधिक कोरडे

सांताक्रूझ येथे वातावरणातील आर्द्रता दिवसभरात ४६ टक्क्यांपर्यंत खाली घसरली. त्यामुळे वातावरण अधिक कोरडे झाले होते. त्यामुळे उष्ण झळांचे प्रमाण अधिक होते. सांताक्रूझ येथे आर्द्रता घटल्याने किमान तापमानाचा पाराही २४.६ अंशांपर्यंत खाली उतरला होता. कुलाबा येथे मात्र काही प्रमाणात आर्द्रता कायम असल्याने किमान तापमान २६.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. डहाणू येथेही रविवारी ३६.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा ३.३ अंशांनी अधिक होते.

दमट वातावरणाची शक्यता वर्तवली

प्रादेशिक हवामान विभागाने रविवारीही उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता वर्तवली होती. मुंबई, ठाणे, पालघर तसेच रायगडमध्ये तुरळक ठिकाणी हा अंदाज नोंदवण्यात आला होता. आज, सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात महामुंबई परिसरामध्ये कोरडे वातावरण असेल, असा अंदाज आहे. रविवारच्या पूर्वानुमानानुसार १५ ऑक्टोबरपर्यंत उष्णतेसंदर्भात कोणताही इशारा जारी करण्यात आलेला नाही. मात्र, या काळात तापमान खूप खाली उतरण्याची शक्यता नाही. आज, सोमवारीही सांताक्रूझ येथे ३६ अंशांच्या आसपास कमाल तापमान असू शकेल. तर त्यानंतर १६ ऑक्टोबरपर्यंत ३५ ते ३६ अंशांदरम्यान कमाल तापमानाचा पारा असेल. १७ ऑक्टोबरला पुन्हा एकदा तापमान वाढण्याचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *