जनगणनेत इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) स्वतंत्र कॉलमचा समावेश करावा, या मागणीसाठी १५ नोव्हेंबरला नवी दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे. या मागणीच्या समर्थनार्थ २ नोव्हेंबरला ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आणि सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक विजय वडेट्टीवार यांनी रविवारी नागपुरात ही घोषणा केली. ऑक्टोबरमध्ये खासदार, आमदारांना निवेदने दिली जाणार आहेत.
बैठकीत नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा या नव्या संघटनेची स्थापना करण्यात आली. संघटनेची समन्वय समिती लवकरच स्थापन केली जाईल व तिची बैठक हैदराबाद किंवा बेंगळुरू येथे घेण्यात येईल. जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समावेश व्हावा म्हणून १२ ते १८ ऑक्टोबर या काळात राज्यातील खासदार व आमदार यांना भेटून निवेदन दिले जातील. यानंतर १५ ऑक्टोबरला प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना या मागणीसाठी निवेदन दिले जाईल. २५ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. २ नोव्हेंबरला या मागणीसाठी भारत बंद आंदोलन केले जाईल. १५ नोव्हेंबरला दिल्लीत आंदोलन केले जाईल, अशी माहिती वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
