सेंट्रल किचनची प्रतीक्षाच! पुणे विद्यापीठातील जेवणात अळ्या अन् प्लॅस्टिकचे तुकडे; वसतिगृहातील मेसचे कंत्राटही रद्द

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मिळणाऱ्या जेवणात अळ्या, किडे आणि प्लॅस्टिकचे तुकडे आढळल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मेसचालकांवर कारवाई केली. मात्र, विद्यापीठातील भोजनाच्या दर्जाबाबतचे प्रश्न कायम असून, पुणे विद्यापीठाला स्वतंत्र सेंट्रल किचनची अद्याप प्रतीक्षा आहे.

पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव, डॉ. प्रफुल्ल पवार आणि सिनेट सदस्य प्रसेनजीत फडणवीस यांनी ३० सप्टेंबरला मुलींच्या मेसची पाहणी केली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत मुलींच्या वसतिगृहातल्या जेवणात अळ्या आढळल्याची घटना समोर आली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तपासणी करून अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद करून मेसचालकाचा परवाना निलंबित केला. अन्न हाताळणाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता, खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवणे, स्वच्छतेची अपुरी व्यवस्था आणि आवश्यक नोंदींचा अभाव अशा त्रुटीही तपासणीत समोर आल्या होत्या.

विद्यापीठात रिफेक्टरी (कॉमन मेस); तसेच मुलांच्या वसतिगृहांमधील दोन मेसच्या माध्यमातून नाश्ता, जेवणाची सुविधा उपलब्ध आहे, तर मुलींच्या वसतिगृहातील मेसचा परवाना निलंबित आहे. त्यामुळे मुलींना नाश्ता, जेवण करण्यासाठी रिफेक्टरीत जावे लागत आहे. साधारण सहा महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या रिफेक्टरीतील जेवणाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर साधारण तीन महिने रिफेक्टरीचा परवाना निलंबित होता. या काळात अमेरिका-इराण युद्धाच्या झळाही इंधन पुरवठ्यावर झाल्याने, विद्यार्थ्यांच्या ताटातील भाज्या गायब झाल्या होत्या.

तेथे नाश्ता परवडत नाही

विद्यापीठामधील फूडमॉलमध्ये किंवा गणेशखिंड परिसरात जेवणाच्या; तसेच नाश्त्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, त्या प्रत्येकालाच परवणाऱ्या नाहीत. त्यामुळे विद्यापीठात सेंट्रल किचनसारखी व्यवस्था असावी, अशी भूमिका डॉ. नितीन करमळकर यांनी कुलगुरू असताना मांडली होती. याबाबत चर्चाही झाली. मात्र, पुढे निर्णय झाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *