नाशिककरांना पिवळ्या पाण्यापासून धोका ; पाणी ठरतंय कॅन्सरला कारक, क्रोमियम हेक्साव्हॅलेंटचे प्रमाण हजार पट

शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीजवळील दत्त नगरमध्ये बोअरवेलमधून येणाऱ्या पिवळ्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये हजार पट अधिक ‘ क्रोमियम हेक्साव्हॅलेंट ’ हे कर्करोगजन्य रसायन आढळून आले आहे. रविवारी नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भातील अहवाल सादर केला. या पाण्यात एक हजार पट क्रोमियम असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

आरोग्याच्य तक्रारी,नागरिकांना त्वचेचे आजार

दत्तनगर परिसरात होणाऱ्या रसायनयुक्त पिवळ्या पाण्याच्या पुरवठ्यामुळे गंभीर स्वरूपाच्या आरोग्याच्य तक्रारी जाणवू लागल्या आहेत. येथील नागरिकांना त्वचेचे आजारही जडले आहेत. याबाबत रहिवाशांनी आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने धावाधाव केली. पाण्याचे नमूने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. अशा पाण्यात प्रति लिटर ०.०५ मिग्रॅ क्रोमियम अपेक्षित असताना ते ५०.३ मिग्रॅ एवढे आढळून आले आहे.

संयुक्तरित्या कारवाईचा बडगा

म्हणजेच एक हजार पट अधिक क्रोमियम असल्याचे दिसून आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या पाण्याचे सर्व स्रोत शोधून ते रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले प्रशासनाने उचलली आहेत. सध्या जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने संयुक्तरित्या कारवाईचा बडगा उगारला आहे. काही कंपन्यांना त्या बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून काही कंपन्या सील करण्यात आल्या आहेत.

तातडीने कारवाईची मागणी

गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने देखील पाण्याच्या प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. त्या अनुषंगाने कंपन्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे. कारवाईस पात्र ठरू शकतील अशा कंपन्यांची संख्या रोज वाढतच असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दिली. मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या अहवालात काही तातडीच्या उपाययोजनांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. यामध्ये अनधिकृत जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या आणिपावसाळी पाण्याचे नाले तोडण्याची सूचना करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *