दुष्काळाची झळ असह्य झाली असताना, साखर, गहू, तांदूळ, डाळी या खाद्यपदार्थांच्या किमतीही ऐन सणासुदीतच गगनाला भिडल्या आहेत. दोन आठवड्यांतच जवळपास सर्वच खाद्यपदार्थांच्या किमतीत १० ते २० टक्के वाढ झाली आहे. यामुळे दिवाळीपूर्वीच सर्वसामान्यांचे दिवाळं निघाले आहे. येत्या काळात खाद्यपदार्थांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बाजारातील पिकांची आवक घटली
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादन घटल्याने बाजारातील पिकांची आवक घटली आहे. यामुळे गेल्या आठवड्यापासूनच खाद्यपदार्थांचे दर महागण्यास सुरुवात झाली आहे. सर्वसामान्यांच्या रोजच्या आहारातील भाजीपोळीपासून वरणभातापर्यंत सर्वच खाद्यपदार्थ महागले आहेत. शिवर गव्हाची प्रतिकिलो किमत ७० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर इतर प्रजातीचेही गहूही ४५ रुपये किलोदराने विक्री होत आहेत.
प्रतिकिलो दर ८०० रुपयांपर्यंत
एका आठवड्यातच प्रतिकिलो दरामध्ये ५ ते ७ रुपयांची वाढ झाली आहे. तांदळाचे दरातही १५ दिवसांत १० रुपयांनी वाढ झाली आहे. साधा तांदूळ ६० ते ७० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. पावसाअभावी तांदळाचे पीक वाया गेल्याने ही दरवाढ झाली आहे. येत्या काळात आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे. उपवासामुळे मागणी वाढल्याने काळ्या खजुराची आवक घटली असून, प्रतिकिलो दर ८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
साखर पुन्हा कडू
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस साखरेचे दर ७२ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले होते. मात्र सरकारी हस्तक्षेपानंतर दरात घसरण होऊन ५२ ते ५५ रुपयांपर्यंत दर खाली आले होते. मात्र यंदा साखरेचे उत्पादन घटण्याच्या अंदाजाने या आठवड्यात प्रतिकिलो दरात ३ ते ५ रुपयांची वाढ झाली आहे. साखरेचे प्रतिकिलो दर ५७ ते ५८ रुपये झाले आहेत. गुळाची किंमत तूर्त स्थिर असली तरी त्यात सणासुदीत वाढ होण्याची शक्यता आहे.
खाद्यतेलाची पिशवी आता एक किलोची
केंद्र सरकारने खाद्यतेलासाठी स्टँडर्ड वजन निश्चित केले आहे. यामुळे आता ग्राहकांना खाद्यतेलाची पिशवी असो किंवा पाच लिटर/किलोचा डबा असो आता पूर्ण वजनाचा मिळणार आहे. यापूर्वी एक किलोची पिशवी आणि पाच किलोच्या डब्याच्या वजनात ३० ते ४० मिलिलिटर कमी दिले जात होते. मात्र आता १ सप्टेंबरपासून स्टँडर्ड वजनानुसारच खाद्यतेल विक्री सुरू झाली आहे. वजन कमी भरल्यास वजनमाप विभागाकडे रितसर तक्रार नोंदवता येणार आहे.
डाळींच्या दरात तेजी
गेल्या आठवड्यापासून डाळींचे दर कडाडले आहेत. तूर,चना,मुग ,मठ व मसूर या डाळींच्या दरात १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे.विदर्भ व मराठवाड या प्रमुख डाळी उत्पादक भागात पाऊस न झाल्याने आवक मंदावली आहे. यामुळे दर वाढले आहेत. तिळाचे भावही गगनाला भिडले आहेत. आताच १६५ किलोपर्यंत दर पोहोचले असून, येत्या काळात २०० रुपये किलोपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. बेसन पिठाचे प्रतिकिलो दर १३० रुपयापर्यंत पोहोचले आहेत रवाही ५२ ते ५५ रुपये किलोने विक्री होत आहे.
डाळींचे दर
डाळींचे प्रकार ४ ऑक्टोबर ११ ऑक्टोबर
तूर १६० १७० ते १८०
चना ९८ ११० ते १२०
मठ ११० १३० ते १४०
मूग ११० १२०
मसूर ११० ११५ ते १२०
