देशभरात साखरेच्या भावात मोठी वाढ होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिश्यावर ताण पडत आहे. शिवाय नागरिकांचे आर्थिक गणित देखील कोलमडलं असल्याचे चित्र आहे. एकंदरीत या सर्व महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने महसूल वाढवण्यासाठी दारूच्या किमतीत दहा पटीने वाढ करावी आणि साखरेचे भाव निम्म्यावर आणावे, अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी केली आहे. शिवाय सरकारने कोणताही निर्णय घेतला तरी सामान्य नागरिक त्या विरुद्ध आंदोलन करत नाही, कारण त्यावर पोलीस केसेस होतात. त्यामुळे आपण जे करत आहात ते सर्वच बरोबर आहे असं नाही, असा टोमणाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
राज्यामध्ये तीन दिवसात साखरेच्या भावा न परवडणारी भाव वाढ झालेली आहे. हिंदू धर्मामध्ये सणासुदीला गोड करतातच व या करता प्रामुख्याने साखर लागते. राज्यामध्ये महिलांना हातभार लावण्याकरता आपण लाडकी बहीण योजना सुरू केली. कारण लाडक्या बहिणीची परिस्थिती चांगली नाही. राज्यामध्ये सनवाराला घरगुती पदार्थ करण्यात लाडकी बहीणच अग्रेसर असते व अशा परिस्थितीत या लाडक्या बहिणीला साखर विकत घेणे परवडत नसेल तर या महिलांना आपण लाडकी बहीण म्हणून यांचा अपमान करीत आहात.
साखर, खाद्यतेल, कडधान्य यांचे भाव कौटुंबिक वापराकरता अर्ध्यावर आणावे, ज्या दारूमुळे कुटुंबाच्या कुटुंब उद्दवस्त होत आहे, तरूण पिढी बरबादीकडे जात आहे, अशा दारूचे भाव आपण दहा पटीने वाढवल्यास राज्यामध्ये आपणास महसूल मिळेल. आपला घाटा भरून निघेल आणि साखर, गोडेतेल व घरगुती वस्तू यांचे भाव आवरल्यास जनता सुजलाम सुफलाम राहील. महाराष्ट्र विधानसभेत व विधान परिषदेत आपण इतके बहुमत जमा केले. आपण कोणताही कायदा केला तरी तो पारित होतो. आपल्या निर्णयात कोणीही बोलत नाही. जनतेने स्वसंरक्षणाकरता आंदोलने केले, तर त्यांच्यावर पोलीस केसेस होतात. जनता आंदोलन करत नाही, याचा अर्थ असा नाही आपण जे करत आहात ते सर्व चांगले आहे. आमचे मागणीचा आपण विचार करावा, हीच अपेक्षा.
