PhD करण्याचं स्वप्न अधुरं, सिंहगड रोडवर PMP बसमधून उतरताना घसरली, स्कूल बसने चिरडलं, 25 वर्षीय तरुणीचा चटका लावणारा अंत

सिंहगड रस्त्यावर पीएमपी बसमधून उतरताना रस्त्यावर पडलेल्या २५ वर्षीय विद्यार्थिनीला मागून आलेल्या स्कूल बसने चिरडले. ही घटना सोमवारी सकाळी घडली. कांचन बळवंत खड्डा (वय २५, मूळ रा. हनुमानगड, राजस्थान) असे या अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

दोन्ही बस चालकांवर गुन्हा

ती संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था (डीआयएटी) येथे एमटेकच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. अपघातास जबाबदार धरुन पीएमपी आणि स्कूल बसच्या चालकांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दोन्ही चालकांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते.

उतरताना पाय घसरला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन ‘डीआयएटी’च्या कृष्णा होस्टेलमध्ये राहत होती. सोमवारी दिघी येथील ‘डीआरडीओ’च्या प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक असल्याने कांचन खडकवासला येथून पीएमपी बसने निघाली होती. सकाळी पावणेदहा वाजताच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील वूड प्लाझा दुकानासमोर पीएमपी बसच्या पुढील दरवाजातून उतरताना तिचा पाय घसरला. त्यामुळे ती रस्त्यावर पडली.

त्या वेळी स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या स्कूल बसच्या चाकाखाली ती आली. यात कांचन गंभीर जखमी झाली. तिला तातडीने हिंगणे खुर्द परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *