नारळी पौर्णिमेपासून समुद्रात गजर; सात बोटी सज्ज, 30 हजार परप्रांतीय कामगारांवर मासेमारी हंगामाची भिस्त

मासेमारी बंदीचा कालावधी संपल्यानंतर आता रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांना समुद्राचे वेध लागले आहेत. नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात करण्याची कोकणातील परंपरा आहे. त्यानुसार जिल्ह्यातील मच्छिमार बोटी सज्ज करण्याच्या कामात व्यस्त असून, पहिल्या टप्प्यात सात बोटी परवाना घेऊन समुद्रात रवाना होणार आहेत.

30 हजार परप्रांतीय कामगारांवर भिस्त

दरम्यान, बोटीवर काम करण्यासाठी स्थानिक मजूर उपलब्ध होत नसल्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमधून सुमारे 25 हजार पुरुष, तर मासळी वेगळी करणे, सुकवणे आदी कामांसाठी सुमारे पाच हजार महिला कामगार रायगडात दाखल होणार आहेत. त्यामुळे यंदाच्या मासेमारी हंगामाची भिस्त तब्बल 30 हजार परप्रांतीय कामगारांवर राहणार आहे.

यंदा 15 ऑगस्टपर्यंत मासेमारीला होती बंदी

दरवर्षी 1 जूनपासून मासेमारी बंदीचा कालावधी सुरू होतो आणि 31 जुलैला संपतो. मात्र, यंदा मासेमारी बंदी 15 ऑगस्टपर्यंत होती. बंदी संपल्यानंतरही समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारांना तातडीने समुद्रात जाता आले नाही. उंच लाटांचा मारा कायम असल्याने समुद्र शांत होण्याची प्रतीक्षा मच्छिमार करीत आहेत. मात्र, नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर मासेमारीला सुरुवात करण्यासाठी बोटींची डागडुजी, रंगरंगोटी, जाळ्यांची दुरुस्ती आणि इतर कामांना वेग आला आहे.

परप्रांतीय कामगारांची भूमिका महत्त्वाची

मासेमारी व्यवसायात परप्रांतीय कामगारांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. गावाकडे गेलेले अनेक कामगार आता पुन्हा बंदरात दाखल होऊ लागले आहेत. काही कामगार दरवर्षी ठराविक बोटीवरच काम करण्यासाठी येतात. मात्र, नव्याने येणाऱ्या कामगारांची ओळख निश्चित करण्यासाठी त्यांची बायोमेट्रिक नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी आधारकार्ड, बँकेचे पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि संबंधित गावातील रहिवासी दाखला सादर करावा लागणार आहे.

कामगारांची नोंदणी केली जाणार

सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ही नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे. दररोज कोणत्या बोटीवरून किती कामगार समुद्रात गेले आहेत, याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभागाकडे उपलब्ध राहणार आहे. एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास समुद्रात किती मच्छिमार आहेत, याची माहिती बचाव पथकाला तत्काळ मिळू शकते. त्यामुळे स्थानिकांसह परप्रांतीय कामगारांची माहिती संकलित केली जात आहे.

कामगारांना किती पैसे मिळतात?

मासेमारीच्या प्रकारानुसार कामगारांची संख्या वेगवेगळी असते. डोली मासेमारीसाठी साधारण पाच, पर्सनेट मासेमारीसाठी आठ, तर एलईडी मासेमारीसाठी किमान १५ कामगारांची आवश्यकता असते. अनुभवी नाखव्याला दिवसाला सुमारे १५०० रुपये, तर इतर कामगारांना सुमारे एक हजार रुपये मजुरी द्यावी लागते. याशिवाय कामगारांच्या जेवणाचा खर्चही बोटमालकाला करावा लागतो.

खोल समुद्रातील मासेमारीसाठी बोटी ५० ते ७० वाव खोल समुद्रात जातात. एका फेरीसाठी साधारण १० ते १२ दिवस लागतात. एका फेरीवर दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. मोठ्या बोटी समुद्रात गेल्यानंतर एक-दोन आठवडे परत येत नसल्याने मजुरी, जेवण आणि इंधनाचा मोठा खर्च बोटमालकाला सहन करावा लागतो. मासळी मिळाली नाही तरी कामगारांचा खर्च मात्र बोटमालकाच्याच माथी पडतो.

स्थानिक तरुणांना प्रशिक्षणाची गरज

एकीकडे विविध प्रकल्पांमध्ये स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी केली जाते; मात्र मासेमारी व्यवसायात स्थानिक तरुणांचा सहभाग कमी असल्याचे चित्र आहे. स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना बोटीवर रोजगार उपलब्ध करून दिल्यास परप्रांतीय कामगारांवरील अवलंबित्व कमी होण्याबरोबरच मच्छिमारांचा खर्चही कमी होऊ शकतो. मात्र, सध्या स्थानिक तरुण बोटीवर काम करण्यास फारसे तयार नसल्याने परराज्यातील कामगारांवरच मच्छिमारांना अवलंबून राहावे लागत आहे.

 

अधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली?

“नारळी पौर्णिमेपासून मासेमारीसाठी समुद्रात जाण्यासाठी सात बोटी परवाना घेऊन सज्ज झाल्या आहेत. बोटीवर काम करण्यासाठी येणाऱ्या कामगारांची नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी कामगार आणि बोटमालकांसाठी तसेच सागरी सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे,” असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रायगड-अलिबाग जलील पटेल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *