भुलेश्वर राजाच्या आगमन सोहळ्यादरम्यान मोठी दुर्घटना होऊन दोन भाविकांचा मृत्यू झाला. बाप्पाची मूर्ती मंडपात नेताना अचानक मूर्ती कोसळली आणि मूर्तीखाली दबून दोन जणांचा मूत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. या घटनेनंतर हा अपघात नेमका कसा झाला? याबाबत निरनिराळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तसंच, मूर्तीकार अनिकेत देसाई यांच्याबाबतीही अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
भुलेश्वर राजाच्या आगमन सोहळ्यातील दुर्घटनेनंतर मूर्तीकार अनिकेत देसाई हे गायब असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर देसाई यांनी 22 फुटी मूर्ती पहिल्यांदाच बनवली होती. त्यामुळं मूर्तीबाबत अधिक चौकशीसाठी पोलीस देसाई यांचा शोध घेत आहेत. त्यांच्या चौकशीतून पोलिस तपासाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, मूर्ती वर्तशॉपमधून बाहेर काढण्याआधी ती ओलसर असल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळं मूर्तीचे वजन आणखी वाढले असू शकते, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
