दक्षिण गडचिरोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, पर्लकोटा नदीच्या रौद्ररूपामुळे भामरागड तालुक्याचा बाह्य जगाशी संपर्क तुटला आहे. नदीच्या पुराचे पाणी जुन्या पुलावरून वाहू लागल्याने भामरागड-आलापल्ली या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. परिणामी, तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भामरागड परिसरात रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यानंतर पर्लकोटा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. नदीवरील नवीन पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने सध्या जुन्या पुलावरूनच वाहतूक सुरू होती. मात्र, पुराचे पाणी पुलावर आल्याने प्रशासनाला हा मार्ग बंद करावा लागला. त्यामुळे भामरागडमार्गे होणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात इतरत्रही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील २४ तासांत कुरखेडा तालुक्यातील कढोली मंडळात ११२.४ मिमी पावसाची नोंद झाली. सिरोंचा तालुक्यातील असरअली मंडळात ८८.६ मिमी, तर अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा मंडळात ७५.४ मिमी पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे अनेक लहान-मोठे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, ग्रामीण भागातील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
दक्षिण गडचिरोलीतील पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
