बाळ गेल्याचं आईला कुठल्या शब्दात सांगू? अमरावतीत अर्भकमृत्यू, बापाचा काळीज चिरणारा सवाल; आमचं लेकरु आहे तसं द्या, पोस्टमार्टम नको, कुटुंबांचा टाहो

आमच्या पिढीतील हे पहिलेच बाळ… आजकाल सिझेरियनचे प्रमाण वाढलेले असताना माझ्या पत्नीची ‘नॉर्मल डिलिव्हरी’ झाली होती. सासरवाडीत मामा झाल्याचा आनंद गगनात मावत नव्हता, गावात उत्साहाने पेढे वाटले गेले. पण, एका भीषण पहाटेने आमचा हा आनंद कायमचा हिरावून घेतला. आमचे बाळ या लाचार आणि बेफिकीर व्यवस्थेने खाल्ले! अजून बायकोला हे सत्य सांगायची हिम्मत होत नाहीये, तिचे सांत्वन करू तरी कसे? अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आवारात टाहो फोडणाऱ्या एका बापाचा हा आक्रंदणारा सवाल तेथे उपस्थित प्रत्येकाचे काळीज पिळवटून टाकत होता.

सोमवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात शिशु अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) काळाने असा काही घाला घातला, की ज्या लेकरांनी अजून रुग्णालयाबाहेरची हवाही अनुभवली नव्हती, त्यांचे श्वास क्षणात थांबले. व्हेंटिलेटरच्या भीषण स्फोटाने लागलेल्या आगीत अवघ्या चार ते दहा दिवसांच्या तीन निष्पाप बालकांचा होरपळून दुर्दैवी अंत झाला. या घटनेने संपूर्ण अमरावती जिल्हा हादरला असून, रुग्णालय परिसरात पसरलेला नातेवाइकांचा आक्रोश थरकाप उडवणारा होता.

मृत बालकाच्या बापाने फोडला टाहो

आपल्या पोटच्या गोळ्याला गमावलेल्या एका पित्याने थेट व्यवस्थेवरच हल्लाबोल केला. ‘माझ्या मुलाला मारून टाकले यांनी! डॉक्टर-नर्सेस सर्व सुखरूप बाहेर पडले, पण आमची लेकरं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. रुग्णालये माणसांचा जीव वाचवण्यासाठी असतात की जीव घेण्यासाठी?’ असा संतप्त सवाल करीत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून देत विचारला. बोराळा (ता. चिखलदरा) येथील मातेची चिमुकली, पुलगाव (जि. वर्धा) आणि खेड (ता. अंजनगाव सुर्जी) येथील मातांचे दोन नवजात मुलगे या दुर्घटनेचे बळी ठरले.

पोस्टमॉर्टमवरून तणाव, पोलिसांचा बंदोबस्त

दुर्घटनेनंतर एसएनसीयूमधील उर्वरित बालकांना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यातील सात बालकांना विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हलवले गेले, मात्र दुर्दैवाने तिघांची प्राणज्योत मालवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *