जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज

एल निनो’च्या काळात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या प्रणालींनी यंदा राज्याला, तसेच धरणक्षेत्रालाही दिलासा दिला आहे. जूनमध्ये राज्याच्या अनेक भागांत मान्सूनने निराशा केल्यानंतर जुलै महिन्यात मात्र पावसाने जोरदार पुनरागमन केले. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, १ ते ३१ जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या तुलनेत ४० टक्के अधिक पावसाची नोंद झाली. राज्यात सरासरी ३२४.२ मिलीमीटर पावसाऐवजी ४५४.२ मिलीमीटर पाऊस झाला.

गोव्यामध्ये अजूनही पावसाची तूट

बंगालच्या उपसागरातील प्रणालींचा फायदा मध्य महाराष्ट्राला सर्वाधिक झाला असून मध्य महाराष्ट्रात ७२ टक्के अतिरिक्त पाऊस झाला. कोकण-गोवा विभागात ३३ टक्के अधिक पाऊस नोंदला गेला. गोव्यामध्ये अजूनही पावसाची तूट असल्याने या तुटीचा परिणाम कोकण-गोवा विभागाच्या आकडेवारीवर झाला आहे अन्यथा कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग वगळता इतर जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये मुंबई शहर आणि उपनगरांसह, पालघर जिल्ह्याचाही समावेश होतो. पालघरमध्ये सरासरीपेक्षा ६१ टक्के अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. विदर्भात २१ टक्के, तर मराठवाड्यात १७ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील चारही विभागांमध्ये जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे दिसत आहे.

कुठे किती पाऊस?

राज्यात नाशिक जिल्ह्याला जुलैच्या पावसाने फायदा झाला. नाशिक जिल्ह्यात सरासरी २९४.५ मिलीमीटर पावसाच्या तुलनेत ७९०.८ मिलीमीटर पाऊस झाला. तो १६९ टक्के अधिक आहे. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात १२९ टक्के, पालघरमध्ये १२४ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली. मुंबई उपनगरात ७४ टक्के, मुंबई शहरात ६० टक्के, रायगडमध्ये ५७ टक्के, ठाणे जिल्ह्यात ५३ टक्के, धुळे जिल्ह्यामध्ये ५३ टक्के, जळगावमध्ये ४९ टक्के आणि अहिल्यानगरमध्ये ४८ टक्के अधिक पाऊस झाला. यामुळे धरण क्षेत्रालाही फायदा झाल्याचे दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *